मुंबई : कोरोनामुळे देशांतील सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत. बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते कधी उघडणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनलॉक ३ च्या टप्प्यात अटी-शर्तींसह थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरु होण्याची शक्यता आहे. कारण माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तसा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे.
राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जुलै रोजी अनलॉक-२ संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटगृहांचे मालक ५० टक्के प्रेक्षकांसह सिनेमागृह सुरु करण्यास मालक तयार आहेत. तर २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमागृह सुरु करण्याचा सरकारचा आग्रह आहे. सिनेमागृहांबरोबरच १ ऑगस्टपासून व्यायमशाळा देखील सुरु होण्याची शक्यता आहे.
५ जुनला मिशन बिगेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या व्यवसायांना कडक नियमांचं पालन करून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. यामध्ये बाजारपेठा, अंतरदेशीय विमानसेवा, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. आता चित्रपटगृहांच्या मालकांनी देखील व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.
कोरोना महामारीमुळे चित्रपट क्षेत्राला तब्बल १५०० कोटींच्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. याचा मल्टिप्लेक्स पेक्षा सिंगल स्क्रिनच्या मालकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता चित्रपटगृहांचे मालक अपेक्षा व्यक्त करतायत की, लवकरच ९० एम एमचा पडदा खुलेल आणि सर्वसामान्यांना चित्रपटांचा आनंद घेता येईल.