मुंबई : महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अर्थात प्रख्यात अभिनेते-सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेले देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचा कारभार पुढील तीन वर्षेही बांदेकरच सांभाळतील.
आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार २४ जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
आदेश बांदेकर गेली १६ वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर अव्याहतपणे करत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भावोजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’मधून घरुनच ते शूटिंग करतात. याशिवाय, ताक धिना धिन, एकापेक्षा एक, हप्ता बंद, झिंग झिंग झिंगाट अशा अनेक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी आतापर्यंत केले आहे. काही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला असून ‘सोहम प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था ते चालवतात.
तीन वर्षांपूर्वी (जुलै २०१७) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. २०१८ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.