प्रतिनिधी : शरद जठार
न्हावरे : शिरुर तालुक्यातील महसूलच्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलाठ्यानं पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस चौकीला जात असताना गायब झाला आहे. या प्रकारानं तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिरुर तालुक्यातील इनामगाव भागात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असून त्यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. बुधवारी एका तलाठ्यानं वाळूचा ट्रक पकडला, मात्र मांडवगण फराटा पोलीस चौकीकडे जात असताना मधेच कुणाचातरी फोन आल्यानं हा ट्रक सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.
शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. यासंदर्भात तलाठी व नायब तहसीलदार यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.