मुंबई | झुंज न्यूज : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र बारावीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बारावीची परीक्षा होणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र बारावीच्या परीक्षा नेमक्या कधी होणार, याबाबत शालेय शिक्षण खाते काय निर्णय घेते याकडे विद्यार्थी-पालक आणि शिक्षक अशा सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
राज्य सरकारने परीक्षा पुढे का ढकलली?
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या होत्या?
बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.