लेखन : माधव पाटील
शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी पदवीधर संघ, पिंपरी-चिंचवड.
मोबा : ७७२०९२३५१०
—————————————————————————————-
जो सद्सद्विवेकबुद्धीने जनतेच्या कल्याणाचे काम करतो त्याची नोंद इतिहास महापुरुष म्हणून घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज असेच होते, अगदी प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे किंवा Out of the box जाऊन विचार करणारे.
शेकडो वर्षांपासून आपल्या भारतात अनेक अंधश्रद्धा चालू आहेत. अनेक कुरीती, कुप्रथा यांनी ग्रस्त असा आपला देश आहे. शिवकालखंडात देखील अशा अनेक चालीरीती अस्तित्वात होत्याच. महाराजांनी तर अशा अनेक प्रथांना खोटं ठरवून दाखवलंय. देवाला / देवीला प्राण्यांचा बळी देण्याऐवजी शिवरायांनी स्वतः रायरेश्वराला आपलं बोट कापुन रक्ताभिषेक केला होता, असा हा एकमेव राजा होता.
शिवछत्रपती कुठेही लिंबू मिरची बांधत अथवा फिरवत बसले नाहीत किंवा देव देवऋशी करत बसले नाहीत. एवढंच काय तर ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असं विसंगत बंधन घातलं होतं त्याच्याविरोधात जाऊन शिवरायांनी सागरात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे गडकिल्ले बांधले होते; आणि त्याचसोबत आरमार देखील उभारले. इथे महाराजांचा प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा गुण दिसून येतो.
खोटा दैववाद महाराजांनी कधीच केला नाही अथवा किल्ला जिंकल्यावर सत्यनारायण देखील घातला नाही. अमावस्येची रात्र ही अशुभ मानली जाते, काहि लोकांच्या मते अमावस्या किंवा अमावस्येच्या रात्री कोणती कामं करू नये असं सांगितलं जातं परंतू शिवरायांच्या बहुतांश मोहीम ह्या अमावस्येच्या रात्रीच व्हायचा, अमावस्येच्या रात्रीच्या गडद अंधाराचा फायदा घेत गनिमी काव्याने बर्याच लढाया आणि गडकिल्ले हे त्यांनी काबिज केले होते. इथे महाराजांची आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची क्षमता लक्षात येते.
राजमाता जिजाऊ शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर सती गेल्या नाहीत, शिवरायांनी त्यांना तसे करण्यापासून अडवलं आणि शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर जी मार्गदर्शनाची उणीव भासणार होती ती जिजाऊंनी भरून काढली आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या शिवरायांचं मार्गदर्शन करत राहील्या.
आदिलशाही फौजेने जेव्हा पुण्याला मसणवटा बनवला होता, बरीच घरं आणि शेतं उध्वस्त केली होती त्या काळात शिवराय आणि जिजाऊंनी पुण्यातील कसबा गणपती मंदिराचा जिर्णोद्धार करत शेतात सोन्याचा नांगर लावत लोकांना पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्यास प्रेरीत केलं. इथे महाराजांचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून अनिष्ट चालीरीती, प्रथा यांना मोडीत काढून जनतेच्या कल्याणाचे निर्णय घेण्याचा गुण लक्षात येतो.
आजही आपल्या देशात अनेक चुकीच्या प्रथा परंपरा अस्तित्वात आहेत. आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत, आपण शिवविचारांचा जागर करूया, समाजातील चुकीच्या चालीरीती मोडून निघाव्यात यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊया, जनजागृती करूया आणि शिवविचारांची ज्योत संबंध महाराष्ट्र आणि भारतभर पेटती ठेऊया.