लेखांकन – दिलीप मालवणकर
मोबा : ९८२२९०२४७०
“आगामी विधान सभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन व लोकसभा निवडणूकांतील महायुतीचे अपयश झाकण्यासाठी पुढे आलेली योजना म्हणजे, ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना.’ या योजनेचा सरसकट सर्व महिलांना लाभ होईल,असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम ठरणार आहे.
या योजनेत अटींचे जे पाचर मारून ठेवले आहे ते लक्षात घेतले तर वस्तुस्थिती लक्षात येईल. पहिली अट २१ ते ६५ वयोगटातील मुली/महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. साधारणत: मुलींचे शिक्षणाचे व शारिरीक वाढीचे वय २१ वर्षांपर्यंतच असते. नेमका हाच कालावधी या योजनेतून वगळलेला आहे. म्हणजे ४० टक्के मुली या योजने पासून वंचित राहतील. साधारणत: मुलींचे लग्न २१ व्या वर्षानंतर व २५ व्या वर्षांपर्यंत होते. त्यानंतर पतीेचे उत्पन्न हे कुटुंबाचे उत्पन्न धरले तर ते अडिच लाखावर ( महिना वेतन २५ हजार धरले तरी) जाऊन गरजू महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.
साधारणत: ४० ते ६५ वयोगटातील महिलांना मुलबाळ असते म्हणजे ती निराधार असू शकत नाही. ती महिला विधवा जरी असली तरी ती निराधार नसते.या योजनेतील अटी नुसार ती महिला निराधार असली पाहिजे तरच या योजनेस पात्र ठरेल. त्यामुळे अजून २५ टक्के महिला या योजनेपासून वंचित राहतात.
कुटुंबातील एकही सदस्य जर आयकरदाता असल्यास या योजनेचा लाभ महिलांना मिळणार नाही. त्यामुळे असंख्य परितक्त्या महिला परंतू घटस्फोट न घेतलेल्या महिलाही या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.
सर्वात महत्वाची व जाचक अट म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणा-या आर्थिक योजनेद्वारे रू. १५०० पेक्षा जास्त लाभ घेतला असल्यास त्या महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल. महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे विधवा, निराधार व परितक्त्या महिलांना अनुदान दिले जाते ते मासिक किमान १५०० असते. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ बहुतांश गरजू महिला घेत आहेत. त्यामुळे अशा सर्व महिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ७० टक्के महिला या योजने पासून वंचित राहतील.
या योजनेतील अटी नुसार ६० वर्षे पर्यंत वय असलेल्या महिलाच या योजनेसाठी पात्र असतील. खरं म्हणजे वयाच्या साठी नंतरच महिलांना आरोग्य विषयक समस्या जाणवतात.यानंतरच अनेक महिलांना वैधव्य येऊन त्या निराधार होतात.या योजनेतून ६५ वया पेक्षा जास्त महिलांना वगळून ही योजना किती हास्यास्पद व नाटकिय आहे, हेच सिद्ध केले आहे.
याचाच अर्थ ही योजना फक्त जाहिरातबाजीसाठी जाहिर केलेली भुलभूलैया योजना आहे. याचा लाभ मिळू शकेल अशा सर्व महिलांना या या योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरवले आहे.