(प्रतिनिधि : प्रसन्न बोराटे / देवेंद्र सोनवणे )
आळंदी | झुंज न्यूज : राज्यात कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. अशातच काही धार्मिळ सोहळ्यांमुळे हे प्रमाण पुन्हा वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीत येत्या ६ डिसेंबरपासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. येत्या ११ डिसेंबरला कार्तिकी एकादशी आणि १४ संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
यादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी ४ ते ५ लाखांहून अधिक वारकरी येतात. हिच संख्या यंदाही कायम राहिली तरी कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ६ ते १४ डिसेंबरदरम्यान आळंदीत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
तसेच यंदाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या सप्ताहासाठी केवळ २० ते ५० वारक-यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे यंदाचा हा भव्यदिव्य संजीवन समाधी सोहळा अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच येथील नागरिकांनी आणि भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.