समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर कोणत्यातरी समाजसुधारक, विचारवंत, नेता किंवा ठराविक एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो आणि व्यक्ती आयुष्य जगताना त्या समाजसुधारकाच्या विचारांना वर्तमानाशी जोडण्याचा, त्याची सुसंगती घालण्याचा प्रयत्न करत असतो. आज वर्तमानाकडे पाहताना मनुष्य, समाज, देश आणि जग नेमक्या कोणत्या दिशेने आणि कुठे चाललंय हाच मोठा प्रश्न आहे. एकीकडे नवनवीन क्षेत्रात होणारी प्रगती, काहीतरी नवीन करण्याची धडपड आणि दुसरीकडे हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,खून असे अनेक वाढते गुन्हे आणि अमानवी घटना. वर्तमानात जगताना माणसांच्या आयुष्यातील माणसांची जागा यंत्रांनी घेतली. भावनेपेक्षा भौतिक गोष्टीला जास्त किंमत आली. नात्यांपेक्षा पैसा श्रेष्ठ ठरला आणि माणूस शिक्षण घेत असताना फक्त शिक्षित झाला सुशिक्षित नाही आणि या अशा अनेक गोष्टीमुळे माणूस आत्मकेंद्री झाला.
आज माणसांना एकमेकांशी संवाद करण्यासाठी वेळ नाही.आईवडिलांना कामामुळे मुलांसाठी वेळ देता येत नाही तर आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन एका आभासी विश्वात स्वतःला गुंतवून घेत आहे.या आभासी दुनियेत आपण अनोळखी व्यक्तीशी तासनतास गप्पा मारतो पण आपल्या जवळच्या,आपल्या घरच्या व्यक्तींना वेळ द्यायला विसरतो.एकमेकांची सुखदुःख , एकमेकांच्या समस्या जाणून न घेतल्यामुळे आपल्यामध्ये एक न भरून निघणारी दरी निर्माण होत आहे. आईवडिलांचा वेळ, प्रेम, माया न मिळाल्यामुळे आजची मुले ते प्रेम आभासी दुनियेत शोधण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात आलेल्या समस्या, चढउतार आईवडिलांशी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलू न शकल्यामुळे त्यांच्या मनातील द्वंधव वाढतच जाते आणि मुले चुकीच्या मार्गाने त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत राहतात आणि अनेक वेळा असहयेतेमुळे मुले आत्महत्या सारख्या गोष्टीसाठी प्रवृत्त होतात.
आज तंत्रज्ञान आणि यंत्राच्या आहारी गेलेली पिढी त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करून समाजातील समस्या सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला विसरते. तसेच तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाचन संस्कृती मागे पडत आहे आणि गांधीजींचे विचार आणि तत्व वाचनात न आल्यामुळे आपल्यला ते विचार आणि त्याचे महत्त्व समजत नाही.आजच्या नवीन जगाला ,या नवीन पिढीला नष्ट करण्यासाठी कोणत्याही आटोमिक शस्त्राची गरज नाही कारण भविष्यात माणूस पूर्णपणे मशिनीवर अवलंबून स्वतःला नष्ट करून घेईल.या भविष्यातील समस्या कमी करण्यासाठी गरज आहे गांधीजींच्या एका महत्वाच्या तत्त्वाची ते म्हणजे स्वावलंबन. गांधीजींनी हे तत्व फक्त सांगितलेच नाही तर त्यांच्या जीवनभर त्यांनी याचे आचरण ही केले .गांधीजी स्वतःची सर्व कामे स्वतःच करत ,स्वतःसाठी लागणारी कपडे ही ते स्वतःच बनवत. त्यांच्या मते स्वावलंबन माणसाला स्वयंपूर्ण बनवते.
वर्तमानातील आणखी एक बिकट समस्या म्हणजे लोकसंख्येचे शहरात वाढते केंद्रीकरण. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे खूप मोठया प्रमाणात नवीन समस्या निर्माण होत आहेत तसेच खेडी ओस पडत चालली आहेत.शहरातील वाढलेल्या लोकसंख्येमूळे माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. शहरामध्ये होणाऱ्या लोकसंख्या केंद्रीकरणाचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण विकासाकडे झालेले दुर्लक्ष. ग्रामीण भागातील सुविधाचा अभाव, उत्पन्नाचे सक्षम साधन नसल्यामुळे तसेच आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी तर कधी स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तर कधी शहरातील सुखसोयी, चमकधमक बघून माणूस शहराकडे आकर्षित होतो. भारतातील ग्रामीण विकासाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातील ग्रामीण भागाचा विकास हा महात्मा गांधीजींच्या चिंतनाचा उत्कट विषय होता. त्यांच्या मते , खेड्यातील लोक जेव्हा स्वयंपूर्ण होतील , तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. भारतातील खेडी शहरांच्या सर्व गरजा भागवित असतात आणि जर खेडीच ओस पडत चालली तर लोकांच्या गरज पूर्ण होणार नाहीत.खेड्याकडे दुर्लक्ष झाल्याने भारताचे दारिद्र्य वाढत आहे ,याची प्रचिती आज सर्वांना आल्याशिवाय राहत नाही.या सर्व गोष्टींचे चिंतन करूनच गांधीजी नेहमी म्हणत की खेड्याकडे चला.
जगामध्ये शस्त्र स्पर्धा वाढली, देशात सत्ता स्पर्धा तर माणसांमध्ये भौतिक गोष्टी मिळवण्याची स्पर्धा वाढली आणि या वाढत्या स्पर्धेने अनेक नवीन समस्या निर्माण केल्या. या स्पर्धेच्या जगात सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वाभिमान,स्वत्व ही गांधीजींची तत्त्वे ज्या तत्त्वावर गांधीजी आयुष्यभर जगले आणि अहिंसेला हत्यार बनवून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हीच तत्त्वे आजच्या या स्पर्धेच्या जगात फक्त वाचनात आहेत आचरणात नाहीत.
आज देशात अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा माणूस हिंसेचा किंवा चुकीचा मार्ग अवलंबतो आणि नवीन समस्या निर्माण करतो. माणूस भौतिक गरजा भागविण्यासाठी वक्तीगत धनसंचय करतो. व्यक्तीगत धनसंचयामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत बनतो आहे आणि गरिब अधिक गरीब बनून माणसांमध्ये विषमतेची दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी किंवा गरिबी निर्मूलन करण्यासाठी वक्तीगत धनसंचयाचा वापर सामाजिक हितासाठी करावा ही महात्मा गांधीजींची विश्वस्त कल्पना आपल्याला अनुकरावी लागेल.
वर्तमानात आपल्या देशासमोरील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे शेतकरी आत्महत्या. आजपर्यत आपल्या देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ह्याचा बिनचूक आकडा आपल्या देशातील प्रशासनाला, सरकारला तोंडपाठ आहे पण ते शेतकरी आत्महत्या का करतात त्यावर ही वेळ का येते, एवढे टोकाचे निर्णय शेतकरी का घेतात? त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत याचा विचार ना प्रशासन करतंय ना सरकार ना भारतातील सामान्य नागरिक. काही परिस्थितीत काही मोजक्याच लोकांना ज्यांना शेतकऱ्यांची खरच किव आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या, आंदोलने केली तरी पण शेतकऱ्यांच्या समस्यांना काही ठोस उपाय होताना दिसून येत नाही कारण सामान्य माणूस, आंदोलन करणारे त्यांच्या समस्यांविषयी बोलतात, शेतकऱ्यांबद्दल खरच खूप प्रेम आहे असे दाखवून स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि प्रशासन, सरकारही खरच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन उपाय केल्याचे नाटक करतात आणि प्रशासकीय अधिकारी, AC कारमधून, घोड्यांवर बसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेले नुकसान बघायला जातात, आणि आपण शेतकऱ्यांवर खूप मोठा उपकार करतोय या अविर्भावात त्यांना एका रांगेत उभा करून भीक दिल्यासारखे त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल चर्चा करतात. किती विसंगती आहे ना आपल्या देशात, जो शेतकरी संपूर्ण देशाला पोसतो, अन्न पुरवतो तोच शेतकरी अधिकाऱ्यांपुढे केविलवाणा चेहरा करून, हात जोडून उभा असतो आणि जे सामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनात, विधानभवनात असतात ते फक्त दिखावा करतात, की त्यांना खरंच सामान्य माणसांशी, शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही देणेघेणे आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या समस्या ,प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे एकत्र येण्याची आणि एक नवीन चळवळ उभा करण्याची.
१९१५ मध्ये महात्मा गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा करून व सखोल अभ्यास करून गांधीजींनी जमीनदाराविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने संपल्या आणि त्यांना न्याय मिळाला. खरंच आजची शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या पाहता असे वाटते की आज परत एकदा शेतकऱ्यांना गांधीजींच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या तत्त्वांची खूप गरज आहे कारण शेतकरी परिस्थितीला वैतागून आत्महत्या करून मेल्यावर त्याला लाखोंची मदत दिली जाते पण शेतकरी जगावा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या सरकारकडे पैसे नसतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा त्याच्या मरणाला किंमत आहे. सरकारकृपेने जर शेतकऱ्यांसाठी एखादी मदत , एखादी योजना शेतकऱ्याच्या विकासासाठी केली तर त्याचाही काळाबाजार भ्रष्टाचार करून विकास मात्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये असलेल्या दलालांचा होतो आणि अन्नदाता म्हणवणारा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब रोज एक वेळच्या अन्नासाठी तरसतो. शेतकऱ्यांच्या मुलांचे नाव विकास असत पण या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विकास त्याच्या आयुष्यात येत नाही आणि सततच्या वाईट परिस्थितीला तोंड देता देता आत्महत्येचा विचार त्याची कधी पाठ सोडत नाही. एक वेळच्या जेवणाची दाणादाण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, हुंड्यामुळे मुलींची लग्न होत नाहीत, बायकोला साडी मिळत नाही आणि खरंच आपला देश महासत्ता होतोय..? आत्महत्या आणि हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही पण शासन आणि प्रस्थापित समाजाने शेतकऱ्यांचे माणूस म्हणून जगणे मान्य करावे हीच अपेक्षा.
आजच्या वर्तमानातील देशासमोरीलच नव्हे तर पूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे शस्त्र स्पर्धा, सत्ता स्पर्धा आणि त्यातून वाढत चाललेला दहशतवाद. वाढत्या स्पर्धेमुळे जगामध्ये शांतीची जागा अशांतीने, माणुसकीची जागा हिंसेने घेतली आहे. ही स्पर्धा जर अशीच वाढत राहिली तर ‘डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल’ हे गांधीजींचे शब्द सत्यात उतरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. महात्मा गांधीजी म्हणत की,” अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन,” त्यांच्या या विचाराची, अहिंसेची आता खरच खूप गरज आहे नाहीतर पूर्ण जग स्पर्धेच्या, हिंसेच्या अहारी जाऊन पूर्ण जगात, माणसात,समाजात अशांती प्रस्थापित होईल. दोन देशात एकमेकांबद्दल असणाऱ्या भीती, असुरक्षितता यामुळे शस्त्र स्पर्धा वाढतच आहे. गांधीजींनी म्हटले आहे की,” सर्वात महत्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय”. गांधीजींचे हे विचार आणि त्यांची तत्त्वे ही आज खरंच काळाची गरज आहे. गांधीजींनी आयुष्यभर गरिबी निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व धर्म समभाव अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने चळवळी करून त्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचे म्हणजे गांधीजींनी अहिंसेने चळवळी करून संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आपण त्यांच्या या मार्गाचे अवलंबून करून या सर्व समस्या अहिंसेच्या मार्गाने नक्कीच सोडवू शकतो. माणसा-माणसात, समाजात, देशात,जगात शांती, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी गांधीजींची तत्त्वे, त्यांचे विचार ही खरंच आज काळाची गरज आहे आणि ज्या गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर जगभरात ‘ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो ती अहिंसा जगभरात फक्त वाचनात नाही तर माणसाच्या आचरणात यावी.
आज सार्वत्रिक असलेल्या इंटरनेटमुळे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे, माणसाच्या कवेत आलेल्या सार्वत्रिक शिक्षणामुळे, वेग धारण केलेल्या दळणवळणामुळे, मानवी संस्कृतीला एकात्मतेच्या दिशेने नेणाऱ्या माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग ‘वसुधैव कुटुम्बकम’ च्या दिशेने वाटचाल करत आहे पण काळाच्या या वाटचालीत आजही जाती-जमाती, धर्म- वंश- वर्ग हे भेद नष्ट झालेले नाहीत. 1992 सालची मुंबईतील भीषण दंगल, 2002 चा गोध्रा व गुजरातमधील हत्याकांड, इस्लामी दहशतवाद्यांचा 2008 चा मुंबईवरील हल्ला सतत होणारे हिंदू- मुस्लिम दंगे, याच वर्षी भीमा-कोरेगाव येथे झालेली दंगल ही उदाहरणे आहेत की आजही माणसामधून त्यांच्या रक्तातून जात, धर्म, वंश, वर्ग ही जी लागलेली कीड आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही. याचाच उपयोग राजकारणी स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतात. समाजामध्ये पूर्णपणे जातीच्या आहारी गेलेले अनेकजण आहेत आणि शिक्षित वर्ग फक्त आम्ही जात-धर्म मानत नाही असा दिखावा करतात आणि दिखाव्यासाठीच त्यांचा एकमेकांसोबत रोटी व्यवहार चालू असतो, पण जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र यांना कुळापासूम, दैवतापासून ते अकर मासी, बारा मासी हे सगळे आठवते कारण आजचा शिकलेला वर्ग हा फक्त शिक्षितच आहे सुशिक्षित नाही.
“जात-धर्म हे फक्त तेच लोक मानत नाहीत ज्यांना दोन वेळच पोट भरण्याची भ्रांत असते. ज्यांचे पोट भरलेले असते ना त्यांना एसीमध्ये बसून जातीचे, धर्माचे राजकारण सुचते आणि जमते आणि या सर्वात भरडून निघतो तो सामान्य माणूस.आजचे राजकारणी जाती-धर्मात द्वेष निर्माण करतात दंगली घडवून आणतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला झालेली ही जाती-धर्माची जखम सतत ओली, रक्ताळलेली ठेवतात. तर दुसरीकडे संपूर्ण जगभर सर्वधर्म समभाव, अहिंसा गांधीजींचे विचार भारतासह जगभरात स्वीकारले जातात. गांधीजी आजीवन सांप्रदायिकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व जाती, धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहचले. गांधीजींचा जगातल्या सर्व महान धर्माच्या मूलभूत सत्यावर विश्वास होता. त्यांच्या मते सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वामध्ये काही न काही चुका आहेत. गांधीजींनी नेहमी सर्वधर्म समभाव या विचाराचा पुरस्कार केला.”
अखंड हिंदुस्थानच्या फाळणी दरम्यान हिंदू- मुस्लिम दंगली रोखण्यासाठीही गांधीजींनी अखंड प्रयत्न केले. त्यांनी सर्व धर्माच्या-जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न केला आणि म्हणूनच गांधीजींच्या एका हाकेवर संपूर्ण भारत देश जात-धर्म विसरून एकत्र येत होता. भारताला महासत्ता बनायचे असेल तर समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी जात-धर्म विसरून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी गांधीजींसारख्या नेतृत्वाची आणि त्यांचे विचार अनुसरण्याची गरज आहे. आज महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. देशात अनेक ठिकाणी निर्दयी घटना समोर येत आहेत. अशा घटनांनी डोकं सुन्न होतंय. माणूस हिंस्त्र पशूपेक्षाही भयंकर वागतोय असं या घटनांतून समोर येतंय. अशा वेळी गांधी विचार कारगर वाटतो.