पिंपरी : गेले पाच महिने भय, काळजी, चिंता असे करोनामय वातावरण मनावर दाटले असताना ते दूर करण्यासाठी आता चैतन्यदायी गणेशोत्सवाची चाहूल शहरवासीयांना लागली आहे. अवघ्या एका दिवसावर हा उत्सव येऊन ठेपला असल्याने सर्वांचीच आतुरता शिगेला पोहचली असून बाजारपेठ खरेदीसाठी सज्ज झाली आहे.
मराठी मनाला अपार ऊर्जा आणि उत्साह देणारा गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने नैराश्यदायी वातावरणाचा नूर पालटायला सुरुवात झाली असून, बाजारपेठेत पुन्हा चैतन्य पसरले आहे. यासोबतच गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत नागरिक गर्दी करू लागले आहेत. गणेशोत्सवाची चाहूल लागताच करोनाचे मळभ दूर होऊन आनंदी व उत्साही वातावरणाची प्रचिती येऊ लागली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री होणार की नाही, ही भीती खोटी ठरवून पुणेकर करोनामुळे आलेले नैराश्य झटकून गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत.
गणेश मूर्ती बुक करणे, पूजेसाठी लागणारे मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी व कापडी तोरण, हार, पूजेचे व प्रसादाचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची आणि मंडळांची लगबग दिसू लागली आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून त्यांचा उत्साह दुणावला आहे. मनाला अपार उत्साह देणारा गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपल्याने गणेशोत्सवासाठीची कामे करण्यासाठी नागरिक विश्वासाने व उत्साहाने बाहेर पडताना दिसत आहेत.
नागरिकांना आता उत्साहाचे वेध लागले असून उत्सवाच्या कामाला गती आली आहे. करोनासह जीवन जगताना करोनाला आता धैर्याने सामोरे जायचे आहे. अशीच जबरदस्त इच्छाशक्ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणवू लागली आहे. गणेशोत्सवामुळे मिळणारी ऊर्जा करोनाशी लढताना उपयोगी पडणार आहे.