लॉकडाऊन हा शब्द आपण सगळे प्रथमच ऐकत आलो आहोत. आपल्या आयुष्यात इतके बदल कधीही झाले नव्हते पण कोरोनाच्या नावाच्या सूक्ष्मजीवाने ते एका क्षणात बदलून टाकले. लहान मोठे उदयोगधंदे बंद झाले,अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यात मध्यमवर्गीय लोक ,सामान्य मजूर ,रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिला यांचे अतोनात हाल झाले, कारण नोकरी आणि पगार दोन्ही नाही आणि त्यात भाडयाचे घर असल्याने घरभाडे भरण्याशिवाय पर्याय नव्हता. जवळपास असलेली पूंजी संपत आली. आणि सुरु झाला रोजचा जीवनमरणाचा संघर्ष, कधी संपणार ते ही माहिती नाही यातच कारखाने बंद झाले आणि मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली,”मिळेल त्या गाडीने नाही तर चालत हा पर्याय मजुरांनी स्वीकारला ” . यात काही मजुरांना नाहक आपले प्राण गमवावे लागले, कारण त्यांचे हातावर पोट असल्याने कामाशिवाय जगणे अशक्य होते. त्यातच काही ठेकेदारांनी आर्थिक मदत आणि मजुरांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली. तर काही ठेकेदारांनी यासाठी मजुरांकडून पैसे सुद्धा घेतले हा विरोधाभास दिसून आला.
सरकारने केंद्राच्या आदेशानुसार वेळोवेळी लाँकडाऊन जाहीर केला, कारण कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि काही केल्या कमी होत नाही . शासनपातळीवर अनेक उपाययोजना सुरू आहेत. सोशल डिस्टिंगच्या नावाखाली माणूस हा माणसापासून दूर होऊ लागला. असे नेहमी म्हटले जाते की एकवेळ माणसाने कोणाच्या सुखात सामील नाही झाले तरी चालेल पण दुःखात नेहमी सहभागी व्हावे परंतु हा विचार कोरोनाने फोल ठरवला. या कोरोनाने तर आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा दुःखात सहभागी होण्याची संधी दिली नाही.कोरोनाविषयी सतत बातम्या आणि जाहिरात यांचा भडीमार सुरू असल्याने लोकांच्या मनात अधिक भीती आणि संभ्रम निर्माण झाला. या कोरोनासंकटात पोलिस यंत्रणा, डाँक्टर आणि त्यांचे कर्मचारी, सफाई कामगार, विविध प्रकारचे मिडिया प्रतिनिधी, विविध संस्था आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कामात सहभागी झाले.
कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. धार्मिक उत्सव, लग्न, समारंभ, राजकीय, सामाजिक कार्यक्रम बंद झाले. एवढेच काय इतक्या वर्षाची वारीची परंपरा म्हणजे पंढरीची वारी यावेळी रद्द करण्यात आली. देवदेवतांची मंदिरे बंद करण्यात आली. या संकटामुळे मोठमोठया व्यापारी शहरांवर अर्थात संपूर्ण जगावर याचा वाईट परिणाम झाला. मुंबईची जीव की प्राण असलेली आणि कितीही मोठे संकट येऊनही मुंबईची ही लोकल कधीही थांबली नाही. परंतु या कोरोनाने तिला थांबण्यास भाग पाडले.रेल्वेचा जन्म हा ब्रिटीश काळात झाला आणि आजगत तिने कधीही थांबण्याचे नाव घेतले नाही किंबहुना थांबणे हे तिला माहिती नव्हते. परंतु आज या कोरोना संकटामुळे ती सुद्धा एका जागेवर शांत थांबली.
जगावर आलेले हे संकट कधी संपले माहिती नाही परंतु माणसाची आपल्या माणसाबद्दल असलेली माणसुकी कधीही संपू नये ही एकच प्रामाणिक इच्छा आहे.आणि लाँकडाऊनसारखा निर्णय जरी योग्य असला तरी लोकांच्या अर्थाजनाचे नियोजन सुद्धा करणे आवश्यक आहे नाही तर जेवढी माणसे कोरोनामुळे मूत्यू पावली नाही तेवढी बेरोजगारी आणि भूकबळीने मरण पावतील असे चित्र समोर उभे राहील.
लेखिका
प्रा.अमिता कदम.
Venus world school.
हडपसर, पुणे
९८१९३९५७८८