शिरूर : कोरोना बाधितांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या हवेली तालुक्यातील १४ पैकी ११ खासगी रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत. ही बाब गंभीर आहे. अधिगृहीत सर्वच खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्वरित सहभागी व्हावे. सहभागी होणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार अशोक पवार यांनी दिला.
हवेली तालुक्यातील खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यास काही अडचणी येत असेल तर आमदार या नात्याने रुग्णालयांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारीही या वेळी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली. परंतु एखादे रुग्णालय जाणीवपूर्वक योजनेत सहभागी होण्यास टाळाटाळ करत असेल तर संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही असेही ते म्हणाले.
रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने हवेली तालुक्यातील विश्वराज ( लोणी काळभोर ) , नवले ( नर्हे ), प्रयागधाम ( कोरेगाव मुळ ) , महेशस्मृती ( शेवाळेवाडी ) , लाईफलाईन ( वाघोली ) , आयमॅक्स ( वाघोली ) , केअर ( वाघोली ) , श्लोक ( शिवापूर ) , शिवम ( कदमवाकवस्ती ) , पल्स ( नर्हे ) , भारत संस्कृती ( वाघोली ) , चिंतामणी ( कोरेगाव मूळ ) , योग ( मांजरी बुद्रुक ) व लोटस ( शेवाळेवाडी ) अशी हवेली तालुक्याच्या विविध भागातील चौदा खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत .
मात्र या १४ पैकी नवले ( नर्हे ) , विश्वराज ( लोणी काळभोर ) व केअर ( वाघोली ) अशी तीनच रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असल्याने वरील तीन रुग्णालयातच कोरोना वरील उपचार मोफत मिळत आहेत. उर्वरित ११ रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना चार हजारापासून सात हजार रुपये दिवसाला मोजावे लागत आहेत.