नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी देशवासीयांना मोठं गिफ्ट देऊ शकतात. पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची (NDHM) घोषणा करू शकतात. एनडीएचएमच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं वैयक्तीक आरोग्य पत्रक तयार करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवली जाईल. यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल. सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावाला कॅबिनेटची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळू शकते.
नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा १५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या मिशनमध्ये चार महत्त्वाची वैशिष्ट्यं असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजी रेकॉर्ड्स, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार ठळक वैशिष्ट्यं असू शकतात. या योजनेत ई-फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवांचा समावेशदेखील करण्यात येईल. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.
देशातील कोणतीही व्यक्ती नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनसाठी नोंदणी करू शकते. मात्र यासाठीची नोंदणी बंधनकारक नसेल. संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतरच त्याच्या आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत स्वत:ची माहिती नोंदवणं रुग्णालयं आणि डॉक्टरांसाठीदेखील बंधनकारक नसेल. या योजनेतला सहभाग पूर्णपणे एच्छिक स्वरुपाचा असेल.
नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लागू केल्यानंतर आरोग्य सेवांमधील पारदर्शकता, त्यांची क्षमता वाढेल, असं मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी इंधू भूषण यांनी व्यक्त केलं. चार प्रमुख लक्ष्यं ठेवून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे. डिजिटल आरोग्य यंत्रणा तयार करून तपशीलाची नोंद करणं, आरोग्याशी संबंधित माहितीचा प्रसार वाढवणं, ती माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म तयार करणं, संपूर्ण देशासाठी आरोग्याची माहिती असलेली रजिस्ट्री उपलब्ध करणं या उद्देशानं नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन राबवण्यात येणार आहे.