गुणवंत कामगार सुरेश कंक आणि सुभाष चव्हाण यांच्या दृष्टीतून
३१ जुलै २००८ या दिवशी आम्ही बजाज ऑटो च्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली त्याला बरोबर बारा वर्ष म्हणजे एक तप पुर्ण झाल. आमच्या पैकी कुणी ५/१०/१५/२०/२५/३० अशी वर्षे तिथे नोकरी केली. कंपनीला काही कारणांनी हा प्लॅंट बंद करावा लागला. कंपनीने स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली व बऱ्याच कामगारांनी ती स्विकारली.
दरम्यान च्या काळात आम्हाला जवळजवळ आठ महिने कंपनीत काम न देता बसवून ठेवले. जाणं, येणं, नाष्टा, जेवण, पगार सर्व सुविधा कंपनीच्या सुरू होत्या पण काम नाही त्यामुळे सर्व कामगार बसून होते. कंपनीने सर्व कामगारांसाठी न्युजपेपर, टीव्ही ची सुविधा उपलब्ध करून दिली. काही कामगारांनी कंपनीत बसून योगासन, प्राणायाम, वाचन, लेखन, अध्यात्मिक ग्रंथ पारायण, हरीपाठ असे उपक्रम सुरू केले.
आपला टाईम कसा जाईल याचे नियोजन करत एक एक दिवस काढत होते सर्व कामगार. सर्वजण एकत्र असल्यामुळे वेळ जात होता. विचारांची देवाणघेवाण होत होती. तरीही मनावर एक मोठे दडपण आले होते. यापुढे काय? कसे होणार? ही परिस्थिती बदलणार आहे की नाही? आलेल्या परिस्थितीला तोंड देणे आणि परिस्थितीचा मुकाबला करणे बजाजचे कामगार जाणून होते. खंबीर झाले होते. धीरगंभीर झाले होते. व्यवस्थापन व युनियन यांच्यात चर्चा सुरू होतीच.
उभय पक्षात वाटाघाटी सुरू होत्या अखेर तोडगा काढण्यात आला. स्वेच्छा निवृत्ती चा निर्णय झाला. स्वच्छेने जाणाऱ्या कामगारांना आम्ही काय देणार आहोत याची तपशीलवार यादी व्यवस्थापनाने कामगारांना सांगितली. बहुतांश कामगारांना बजाज आटो लि. आकुर्डी कामगारांचे कोणतेही नुकसान होऊ न देता जे पँकेज देत आहे ते ठीक वाटले आणि एकाच वेळी दोन हजारांहून अधिक कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती स्विकारली.
३१ जुलै २००८ हा आमच्या नोकरीचा अखेरचा दिवस ठरला होता. तर काही कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती न स्वीकारता नोकरीत राहणे पसंत केले. तेव्हा पासून आज पर्यंत बारा वर्षात अनेकांच्या जीवनात बदल झालेत. कुणी व्यवस्थित स्थिरस्थावर झाले. तर काहींनी बचत न करता उधळपट्टी केली. त्यांना आता छोटीमोठी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करावा लागतो आहे. दुर्दैवाने काही कामगार बांधव हे जग सोडून गेले. आलेले धन नीट मार्गी लावून काही कामगारांनी व्यवसाय करून चांगलं नांव कमावलं. दहा वर्षे कंपनीने दहा हजार रुपये पगार घरी बसून दिला. त्यानंतर पगार बंद झाला. प्रायव्हेट कंपनीतून बाहेर पडणाऱ्या कामगारांना पेन्शन खुप अल्प स्वल्प मिळते. ती सर्वाना सुरू झाली.
कंपनीने एक चांगले केले की सर्व पैसे हातात न देता दरमहा बँकेत जमा केले व त्यामुळे कुटुंबाची गुजराण व्यवस्थित चालू राहीली. कंपनीने दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळला. अगदी वेळच्या वेळी दरमहा पगार जमा होत होता. बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांनी आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात केली. कंपनीने पण कामगारांना वाऱ्यावर न सोडता त्यांना पुढील दहा वर्षांत अडचण येणार नाही याची काळजी घेतली.
“बजाज आटो लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुलकुमार बजाज जो शब्द देतात तो पाळतात याचा प्रत्यय कामगारांना आला. आज आहेत ते कामगार माझे आहेत आणि जे गेले तेही कामगार माझेच आहेत असे राहुलकुमार बजाज नेहमी म्हणतात. स्वेच्छा निवृत्तीच्या तपपूर्ती ला या आठवणी जाग्या झाल्या. आजही बजाजचा जुना मित्रपरिवार एकमेकांना भेटतो. सुख दुःखात सहभागी होतो. व्हाट्स, फेसबुक, फोनच्या माध्यमातून संपर्क साधतो. याचा मनस्वी आनंद वाटतो. असे मनोगत गुणवंत कामगार सुरेश कंक आणि सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केले.”