पुणे I झुंज न्यूज : भारतातील व भारताबाहेरील सुमारे ४५ कवयित्रींचे मधुसिंधू काव्यप्रकारातील संमेलन नुकतेच संपन्न झाले. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या संमेलनाचे उद्घाटन सुभद्राताई वागसकर यांच्या हस्ते झाले. ईशस्तवन सुरभी फडणीस यांनी तर स्वागतगीत आशा नष्टे यांनी सादर केले.
या ऑनलाइन काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थान माधुरी मगर – काकडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी प्रा.पद्मा हुशिंग व प्रा. डॉ.अरुणा मोरे यांनी रसिकांना खिळवून ठेवणारी मनोगते सादर केली. त्यांनी विविध कवी – कवयित्रींचे साहित्यातील योगदान आणि समाजासाठी असलेले बोधप्रद कार्य यावर प्रकाशझोत टाकला.
पर्यावरण,निसर्ग,मुलगी वाचवा,अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आरोग्य, साक्षरता, स्त्रियांचे योगदान अशा विविध सामाजिक विषयांवर कविता सादर झाल्या. वृक्षारोपण,पर्यावरण रक्षणाची गरज कवितेच्या माध्यमातून काही कवयित्रींनी बोलून दाखवले. मुलगी वाचवून तिच्या कर्तृत्वाला वाव देण्याविषयी आणि तिच्या कार्यक्षमतेविषयी जणू काही आश्वासक दृष्टिकोन प्रकट करणाऱ्या काही कविता रसिकमनाला भावून गेल्या. सामाजिक संदर्भ असणाऱ्या कविता समाजातील व्यसनांपोटी होणाऱ्या ऱ्हासाचे चित्रणही सहजपणे करत गेल्या. काही कवितांमधून निसर्गाचे सुंदर वर्णन दिसून आले.साहित्यविषयक गुणगाण गाणाऱ्या काही सुंदर रचनाही सादर झाल्या.
राजश्री वाणी-मराठे व प्रा. सुनीता फडणीस यांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सर्वच कवितांचे अतिशय सुरेख पद्धतीने सादरीकरण झाले.केवळ मनोरंजनाला प्राधान्य न देता प्रबोधनात्मक पातळीवरही हे संमेलन यशस्वी ठरले. या पहिल्या-वहिल्या काव्यसंमेलनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अपर्णा कुलकर्णी,मनिषा पटवर्धन, प्रतिमा काळे मृदुला कुलकर्णी, पद्मश्री वडगावे, कोमल शिंदे कालिंदी वाणी, अलका येवले, वृंदा बेडेकर, प्रतिभा झगडे, सुजाता साळवे, शशिकला सुराणा, श्वेता गुरव, साधना कपाळे, प्रियंका चंदाले, मंगला शेटे, कविता पिंपरे, मनिषा कुमठेकर, माधुरी देवरे, सुरेखा बिबवे, शीतल कुलकर्णी, अंजली बनशेळकीकर, सिद्धी रानडे, शोभा जोशी, उषा मुरूमकर, कल्पना पवार, सरिता कलढोणे, स्नेहा रंजलकर, सुरेखा हरपाळे, योगिता थिटे, वंदना नाईक, रश्मी देवगडे, कीर्ती म्हात्रे,विद्यादेवी देशिंगे, वर्षा फटकाळे, प्रतिभा बोबे, शारदा पाटील, शालिनी गौरीशंकर, प्रीती भिसे, प्रतीक्षा नांदेडकर, अनिला मुंगसे, विजया चिंचोळी, अनुष्का गोवेकर, सुरेखा सोनारे, अर्चना गरूड यांचा या संमेलनात सहभाग होता.