पुणे| झुंज न्यूज : बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी, माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको, अशी प्रार्थना करत आज वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात, वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.
बुधवारी वट सावित्री पौर्णिमा आहे. या दिवशी बायका वट वृक्षाची पूजा करून सात जन्म आम्हाला हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, बायकोची इच्छा पूर्ण करू नको यासाठी वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पुरुषांनी यमराजाला व मुंजाला साकडे घातले आहे की, हे यमराजा आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की अशा बायकांबरोबर सात जन्म काय सात सेकंद देखील संसार करू शकत नाहीत.
आमच्या बायकांनी आमच्या कुटुंबाचा छळ करून असह्य वेदना दिल्या आहेत. अशा बायका उद्या सावित्रीप्रमाणे वट वृक्षाची पूजा करून यमराजाला साकडे घालतील. ते साकडे न्यायोचित नाही व योग्य नाही म्हणून आमच्या पत्नीचे उद्या काही एक म्हणणे ऐकू नकोस व आम्हाला अशा प्रकारच्या बायका देण्यापेक्षा कायमस्वरुपी मुंजा (अविवाहित) ठेव, अशी मनोकामना यावेळी संघटनेतील पुरुषांनी केली.
महिलांप्रमाणे पुरुषांसाठी कायदे करण्याची मागणी
पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचे झुकते माप असल्याने अनेक महिला कायद्याचा गैरवापर करत पुरुषांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे, पुरुषांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
शासनाने याकडे लक्ष देऊन पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा आणि पुरुषांचे बळी घेणे थांबवावे, अशी मागणी असून, आम्ही शासनास वारंवार निवेदन दिले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे, मुंजाला साकडे घालत असून या वर्षीची पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे पाचवी पिंपळ पौर्णिमा साजरी केल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिली. या पूजनात अॅड. दासोपंत दहिफळे, चरणसिंग घुसिंगे, वैभव घोळवे, भिकन चंदन, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.