पुणे | झुंज न्यूज : पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
तसेच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
महापौर मुक्ता टिळक यांची प्रतिक्रिया
पावासाळ्यात अशी कारवाई करायची नाही हे बैठकीत ठरलं होतं, पण ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल, जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु, असं भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.
भाजपने हात झटकू नये – प्रशांत जगताप, पुणे माजी महापौर
मी पुण्याचा माजी महापौर आहे, महापौर जे निर्णय घेतात, ते प्रशासन ऐकतं, त्यामुळे राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपने हात झटकू नये, आम्ही प्रशासन चालवलं आहे, सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही, असा दावा राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडून केला जात आहे.
पाडापाडी महापालिकेच्या वतीने सुरु, भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रतिक्रिया
ओढ्याच्या प्रवाहात घरं आहेत त्यांना पर्यायी घरं द्यावी, थोडी लांब असली तरी चालेल, बिल्डरच्या जागेवरही कारवाई सुरु आहे, आधी नोटीस दिली होती, ओढ्यात राहणं योग्य नाही, महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, नियमाप्रमाणे कारवाई होत असताना पुनर्वसनाकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही, मी आयुक्तांशी बोलतो, तुम्हाला महापालिका कायमस्वरुपी घर देत असेल तर व्यवस्था होईल, दरवर्षी घरात पाणी शिरणं, घरं वाहून जाणं योग्य नाही, कायमस्वरुपी व्यवस्था होईल, असं भाजप खासदार गिरीश बापट म्हणाले.
पाडापाडी महापालिकेच्या वतीने सुरु आहे. त्यांचं पुनर्वसन बिल्डरने केलं ते सुद्धा ओढ्यात केलं. त्यांच्यावरही कारवाई सुरु आहे. चांगल्या जागी पुनर्वसन व्हायला हवी. पर्यायी व्यवस्था महापालिका करत असेल तर सहकार्य करावं असं स्थानिकांना मी सांगितलं आहे, असं गिरीश बापट यांनी सांगितलं. मी आता महापौर आणि आयुक्तांशी बोलून अधिक माहिती घेतो, असं खासदार बापट म्हणाले.
आंबील ओढ्याची थोडक्यात माहिती
आंबील ओढा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक ओढा आहे. आंबील ओढ्याची सुरुवात कात्रज तलावापासून होते. पेशव्यांच्या कारकिर्दीत आंबील ओढा ही पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजली जायची. या ओढ्याकाठी इतिहासकाळात एक जागृत जोगेश्वरी मंदिर होते.
सध्या आंबील ओढ्याच्या काठी कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसले आहेत. आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला मिळतो.