पुणे I झुंज न्यूज : थेरगाव येथील ‘द रायझिंग स्टार प्रॉडक्शन हाऊस’ निर्मित तर संभाजी बारबोले व संग्राम दाढे लिखीत आणि विनय सोनवणे दिग्दर्शित “रूपानं तुझ्या केली जादु गं” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सोशल मीडियावर सध्या या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.
“रूपानं तुझ्या केली जादु गं” या गाण्याच्या निमित्तानं आकाश हजगुडे या कलाकाराच्या सुरेख संगीताची व गाण्याची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. सोबतच या गाण्यात अभिनेत्री मोहिनी आणि अभिनेता संभाजी बारबोले या जोडीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.
एम. के. स्टुडियो प्रस्तुत हे गाणे असून थेरगाव येथील ‘द रायझिंग स्टार प्रॉडक्शन हाऊस’ने या गाण्याची निर्मिती केली आहे. तर डीओपी अमर चाकोटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यातून व विशेष कलात्मकेतून प्रत्येक क्षण अत्यंत हटके टिपल्याचे व्हिडिओ मध्ये दिसते. आदित्य सातदिवे, राहुल जाधव आणि संभाजी बारबोले या गाण्याचे निर्माते आहेत.
संभाजी बारबोले यांनी या आधीही अनेक गाणी स्वतः लिहली आहेत तसेच निर्मित केली आहेत. यावेळी त्यांच्या “रूपानं तुझ्या केली जादु गं” हे खास सॉंग प्रेमी युगलांवर मोहिनी पाडत असून युवा वर्गात मोठ्या प्रमाणावर हिट झाले आहे. तसेच दिग्दर्शन, गीत, संगीत, नृत्य यासह सर्वच तांत्रिक बाबींमध्ये हे गाणे अत्यंत उजवे ठरले आहे.