नाशिक I झुंज न्यूज : शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळख
कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधित्व करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवसेनेच्या रणरागिनी अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे कोरोना काळातही त्या फ्रंटालाईनवर उतरुन काम करत होत्या. कोरोना काळात रुग्णाला रुग्णालय मिळवून देणे, औषधाची सोय करणे, जनजागृती करणं, यासारखी अनेक लोक हिताची कामं त्यांनी केली.
कल्पना पांडे यांचा अल्प परिचय
कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधित्व करत होत्या. नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले.
महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्या नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत.