पिंपरी I झुंज न्यूज : प्रसिद्ध गायिका ‘सावनी रविंद्र’ हीला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने तीचा नुकताच सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड़ कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष विजय भिसे, कार्याध्यक्ष सतीश इंगले, सचिव निवेदक विजय बोत्रे पाटील, अतिरिक्त आयुक्त अमृतराव सावंत आदींनी घरी जाऊन सावनी रवींद्र व तीचे वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे यांचे अभिनंदन केले .
‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनीला हा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या सावनीने याआधी मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी अशी विविध भाषेतील गाणी गायली आहेत. पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे, शहरातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा, यशस्वी व्यक्तींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहील असे फाउंडेशन चे अध्यक्ष विजय भिसे यांनी सांगितले.
दरम्यान पुढील महिन्यात दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.