मुंबई | झुंज न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करुन मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन दिले.
या बैठकीला महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, जमनादास सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदींची उपास्थिती होती.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी देखील सहभागी झाले होते.
वृत्तपत्र संपादक-मालकांशीही चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनला पर्याय सुचवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार त्यांनी काल वृत्तपत्र संपादक, मालकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान काही पर्याय सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही “लॉकडाऊन कुणालाही हवाहवासा वाटत नाही. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही लढाई तुम्ही आम्ही मिळून लढावी लागेल असं नमूद केलं”
“आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं.