कोलकाता | झुंज न्यूज : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना एका घटनेमुळे भाजप पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. भाजपचे ‘जुमले’ आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी या दोन मुद्द्यांवरुन विरोधक कायम मोदी सरकारला लक्ष्य करतात. आतादेखील असाच मोठेपणा करण्याचा नाद भाजपच्या अंगलट येताना दिसत आहे.
भाजपकडून काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान निवास योजनेच्या यशाचा दिंडोरा पिटणाऱ्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर बंगाल’ अशा मथळ्यासह या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये एका लाभार्थी महिलेचे छायाचित्र आणि २४ लाख कुटुंबाना घरकुल मिळाल्याचा दावा करण्यात आला होता.
ही जाहिरात पाहून प्रसारमाध्यमांनी या महिलेचा शोध घेतला. तिचे नाव लक्ष्मी देवी असे आहे. ही जाहिरात छापून आल्यानंतर त्यामध्ये आपले छायाचित्र आहे, हे लक्ष्मी देवी यांना समजले. या महिलेची अधिक चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. लक्ष्मी देवी यांना पंतप्रधान निवास योजनेतंर्गत कोणतेही घर मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले.
लक्ष्मी देवी अजूनही राहतात भाड्याच्या घरात
मोदी सरकारकडून लक्ष्मी देवी या पंतप्रधान निवास योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, लक्ष्मी देवी या प्रत्यक्षात भाड्याच्या लहानशा झोपडीवजा घरात राहतात. त्यासाठी लक्ष्मी देवी महिन्याला ५०० रुपये भाडे देतात. ही सगळी सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.
लक्ष्मी देवी या मूळच्या बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. त्या लहान असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थलांतरित झाले होते. गेल्या ४० वर्षांपासून लक्ष्मी देवी कोलकाता येथील मलागा लाइन परिसरात राहतात. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मी देवी यांच्यावर येऊन पडली. त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. दोन मुलं माझ्यासोबत राहतात. ते कुरिअर पोहोचवण्याचं काम करतात. यामधून त्यांना दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात, असे लक्ष्मी देवी यांनी सांगितले.
वृत्तपत्रांमध्ये छायाचित्र छापून आल्यामुळे लक्ष्मी देवी वैतागल्या
लक्ष्मी देवी यांनी वृत्तपत्रांमध्ये आपले छायाचित्र बघितल्यापासून त्या प्रचंड वैतागल्या आहेत. हा फोटो मुळात घेतला कधी गेला याची माहितीही लक्ष्मी देवी यांना नाही. त्यांनी सगळया स्थानिक वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन माझे छायाचित्र का छापले, अशी विचारणा केली. तेव्हा हा फोटो वृत्तपत्रांनी छापला नसून केंद्र सरकारने जाहिरात दिल्याचे त्यांना समजले.