हिंगणघाट I झुंज न्यूज : निसर्गसाथी फाउंडेशन मागील काही वर्षापासून पर्यावरण तथा निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत असून निसर्ग चक्र सुरळीत तरच पर्यावरण संतुलन चांगले राहील. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी निसर्गातील पशु, पक्षी आदींचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे निसर्ग साथी फाउंडेशनने हेरून हिंगणघाट शहरासह तालुक्यातील पशु, पक्षी सुरळीत राहण्यासाठी तालुका पक्षी व सर्प डिजिटल निवडणुकीचे आयोजन ११ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान केले आहे. यात तालुक्यातील सर्व नागरिकांचा समावेश आहे.
राज्यात काही मोजक्या जिल्ह्यात शहर पक्षी निवडले गेले असले तरी हिंगणघाट तालुक्यात पहिल्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार असून देशासह राज्यात अन्य कुठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही. मात्र निसर्ग साथी फाऊंडेशनचे पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे.
अशी होणार डिजिटल निवडणूक
तालुक्यातील नागरिक शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध व्हाट्स अप, टेलिग्राम, फेसबुकचे माध्यमातून
https://forms.gle/juBUBhkRsakH5sxM8
ही लिंक दिनांक ११ फेब्रुवारी रोजी गुरुवार सकाळी ०७ वाजेपासून ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सोमवार सायंकाळी ०५ वाजेपर्यंत नागरिकांना मतदार मतदान करण्यासाठी लिंक ओपन राहील. यात ठिपक्याचा पिंगळा, कोतवाल, चिमणी, शिक्रा, कावळा, गायबगळा, या सहा पक्षी उमेदवाराचा तर अजगर, धामण, धोंड्या, तस्कर, कवड्या अशा पाच सर्प उमेदवारांचा समावेश आहे.
“निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाटचे वतीने आयोजित तालुका पक्षी , सर्प निवडणुकीत हिरीरीने भाग घेऊन डिजिटल मतदान करून आपल्या तालुक्याला जिल्ह्यात , राज्यात तथा देशभरात तालुका पक्षी, सर्प निवडीचा बहुमान मिळवून देऊन राज्यात हिंगणघाट तालुक्याचा नावलौकिक व्हावा हीच अपेक्षा. असे आव्हान हिंगणघाट – समुद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी मतदार संघातील सर्व नागरिकांना केले आहे. तसेच तालुका पक्षी, सर्प निवडणुकीत निवड झालेल्या पक्षी, सर्प यांचे शहरात स्मारक (शिल्प) उभारण्यासाठी मी निश्चितच निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाटला सहकार्य करणार आहे असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.