मुळशी I झुंज न्यूज : पुणे जिल्हा परिषदेकडून दरवर्षी दिला जाणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी यंदा मुळशी तालुक्यातून माण गावची निवड झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांनी गावस्तरावर राबविलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, कचरा, सांडपाणी, आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामागिरी मुळे सन २०२० – २०२१ साठीचा “सुंदर गाव पुरस्कार” आयटीनगरीतील माण गावाला भेटला आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. आयटीनगरी परिसरातील महत्वाची ग्रामपंचायत म्हणून माण ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. आयटीपार्कचा सुमारे साठ टक्क्याहून अधिक भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो.
नोकरी व्यवसायानिमित्त हजारो नागरिक याठिकाणी वास्तव्यास आल्याने गावच्या लोकसंख्येत कित्येक पटीत वाढ झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर केलेली लोकाभीमुख विकासकामे, रस्ते, पथदिवे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक दायीत्व, पर्यावरण, केंद्र आणि राज्यशासनाच्या राबाविलेल्या योजना अशा विविध निकषावर हा पुरस्कार दिला जातो.
मुळशीतील एकूण ९५ ग्रामपंचायतीं मधून यंदाचा ‘सुंदर गाव पुरस्कार’ माण गावाने पटकावला आहे. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
“तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे केली आहेत. नागरिकांसाठी मूलभूत गरजा, सोयी सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, हायटेक कार्यालय, विविध शासकीय योजना यामध्ये भरीव काम केले आहेत. अनेक लोकाभीमुख महत्वकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. सर्वांच्या सहकार्यानेच यंदाचा ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार गावाला मिळाला आहे. तालुक्यासाठी ‘माण’ प्रेरणादायी गाव असणार आहे.
(- पांडुरंग ओझरकर, सभापती, मुळशी तालुका.)