पिंपरी I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता शिवनेरी किल्ल्यावर पाचारण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, खा. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके व शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत छत्रपतींचा जन्मसोहळा साजरा केला.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती आज महाराष्ट्रासह देशभरात साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे यंदा जल्लोष करता येणार नसला तरी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिवरायांचे अद्वितीय कार्य आणि पराक्रमांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.
प्रभात फे-या, बाईक रॅली, मिरवणुका न काढता शिवजयंती पारंपरिक उत्साहात साजरी केली जाणार आहे. अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम तसेच स्वच्छता जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. अनेक ठिकाणी पोवाडे, नाटके यांचे ऑनलाईन प्रक्षेपण केले जाणार आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंती उत्सवासाठी १०० जणांच्या उपस्थितीचीही परवानगी सरकारने दिली आहे. त्या मर्यादेचे पालन करून उद्याचा शिवजयंती उत्सव साजरा होत आहे.