पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील २० ते २५ वर्षांपासून जमा झालेला कचारा मोशी डेपोवर टाकण्यात आला आहे. याठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून महापालिका पर्यावरण विभागाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याला महापालिका स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली.
स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. मोशी कचरा डेपो येथील जुन्या डंपींग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करणेबाबाबत मे. हिंद ऍग्रो अँड केमीकल्स कंपनीने लघुत्तम दराने काम करण्यासाठी करारनामा करुन कामाचा आदेश देण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
कचरा डेपोवर साचलेल्या डोंगरांमुळे मोशी, इंद्रायणीनगर, गंधर्वनगरी, जाधववाडी, चिखली, कुदळवाडी परिसरातील नागरिकांची दुर्गंधीचा त्रास होत होता. आता बायोमायनिंग प्रकल्पामुळे ही समस्या सोडवण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.
पूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य : संजय कुलकर्णी
महापालिका पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, मोशी येथील कचरा डेपोवर गेल्या २० ते २५ वर्षांपासून कचारा टाकला जातो. सध्यस्थितीला शहरातून दैनंदिन सुमारे १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने २०१९ मध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पाची क्षमता दैनंदिन १ हजार टन इतकी आहे. त्यामुळे पूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य होते. त्यामुळे महापालिका पर्यावरण विभागाने मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपनीला कामाचे आदेश देण्याबाबत आम्ही स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच बायोमायनिंगच्या कामाला सुरूवात होईल.