पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणाचे रक्षण व्हावे. तसेच, इंद्रायणी नदी संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. कुदळवाडी- जाधववाडी येथील नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया आणि पुन: वापर करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे.
महापालिका पर्यावरण विभागाच्या पुढाकाराने नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन पुन: वापर करण्याबाबतचा हा प्रकल्प तीन महिन्यांसाठी प्रयोगिक तत्त्वावर चालवण्यात येईल. त्यानंतर ५ वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीचे काम मे. मरक्युरस वॉटर ट्रिटमेंट (ई) प्रा. लि. या कंपनीला देण्यात येणार आहे. याबाबत संबंधित कंपनीशी करार करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
सत्ताधारी भाजपाचे माजी महापौर राहुल जाधव जाधववाडी- कुदळवाडी प्रभागाचे नेतृत्त्व करतात. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या नाल्यावर भेट दिली होती. त्यावेळी मोठ्याप्रमाणात सांडपाणी आणि केमिकलयुक्तपाणी नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे, हे निदर्शनास आल्यानंतर हर्डिकर यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता असा प्रकल्प दृष्टीक्षेपात आला आहे.
काय आहे प्रस्ताव..?
महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने इंद्रायणी नदी पुर्नरुज्जीवन प्रकल्प राबवणे अंतर्गत कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुन: वापर करण्याबाबत राबवलेल्या निविदा प्रक्रियेत मे. मरक्युरस वॉअर ट्रिटमेंट (ई) प्रा. लि. कंपनी पात्र ठरली आहे. त्यानुसार ११ कोटी २२ लाख ८८ हजार १०९ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर होणार पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी…
कुदळवाडी- जाधवाडी- चिखली परिसारातील औद्योगिक कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणात संबंधित नाल्यातून थेट नदीपात्रात सोडले जात होते. अनधिकृतपणे अनेक कंपन्यांनी याठिकाणी शेड उभारले आहेत. त्यामधील ॲसीड, ऑईलयुक्त पाणी विना प्रक्रिया नदीत मिसळले जाते. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महमंडळाने अनेकदा महापालिका प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे याभागातील नाल्यावर पॅकेज वॉटर ट्रिटमेंट प्लँट महापालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आहे. ज्यामुळे सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया केली जाईल. संबंधित प्रक्रिया केलेले पाणी या भागातील सोसायटींमध्ये पिण्याव्यतिरक्त वापरासाठी वापरता येणार आहे. तशी मागणीही या भागातून होत आहे. परिणामी, या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिका पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
नमामी इंद्रायणी मोहिमेला चालना…
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी ‘भोसरी व्हीजन-2020’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले होते. २०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भाजपाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले. आता जाधववाडी- कुदळवाडी येथील नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारल्यामुळे इंद्रायणी नदी सुधारणेच्या मोहीमेला बळ मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.