ताथवडे I झुंज न्यूज : ताथवडे परिसरातील साई कॉलनी येथे नव्याने सुरु झालेल्या हिरकणी स्वयं. महिला बचत गटाचा उदघाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या बचत गटात २० महिलांचा सहभाग असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकीचा सहभाग दिसून आला.
नगरसेविका झामाताई बारणे , नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेविका माया बारणे आणि नगरसेविका ममता गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, सरस्वती क्लासेसचे संचालक महेंद्र शिखरे, बचत गटाच्या अध्यक्ष नलिनी दत्तात्रय महिंद्रे, उपाध्यक्ष शितल महेंद्र शिखरे, सचिव शोभा काशिनाथ चव्हाण आणि गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी झामाताई बारणे यांनी बचतगट व महत्त्व, महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता, सरकारी योजना, व्यावसायिक फायदा, महिलांचे एकत्रीकरणाचे महत्व आणि महापालिकेच्या सुविधा या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांना गट चालविताना काही गरज लागल्यास किंवा काही अडचण आल्यास आम्ही सर्व नगरसदस्य आपल्या मदतीस कायम उभे असू असे आश्वासन सर्व मान्यवरांनी दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूजा विनायक चव्हाण तर सरस्वती क्लासेसचे संचालक महेंद्र शिखरे (सर) यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी काशिनाथ चव्हाण, दत्तात्रय महिंद्रे, गणेश जाधव, राहुल भापकर आणि अजय काळे यांनी विशेष सहकार्य केले.