पिंपरी । झुंज न्यूज : श्रीक्षेत्र अयोध्या येथे राममंदिर निर्माणाचे काम सुरु आहे. त्यासाठी संपूर्ण भारतभरातून निर्माण निधी जमा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने एक कोटी रुपयांचे समर्पण करण्यात आले.
प्राधिकरण येथील सावरकर भवन येथे विश्व हिंदू परिषदेचे अखील भारतीय महामंत्री विनायक देशपांडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते समर्पण निधी सुपूर्त करण्यात आला.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, उपमहापौर केशव घोळवे, माजी महापौर नितीन काळजे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगिरी, नगरसेवक शीतल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका शारदा बाबर, कमला घोलप, बोराडे, उत्तम केंदळे, सविता खुळे, झामाबाई बारणे, अनुराधा गोरखे, जिल्हा सरचिटणीस विजय फुगे, बाबू नायर, महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सारिका सस्ते, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक बाबा त्रिभुवन, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, महिला प्रदेश कोशाध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक बारणे, दत्ता गव्हाणे, स्वीकृत प्रभाग सदस्य वैशाली खाडे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर आदींसह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचा परिचय जिल्हा सरचिटणीस ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी केला. जिल्हा सरचिटणीस राजु दुर्गे यांनी आभार मानले.
पिंपरी- चिंचवडकरांचा खारीचा वाटा…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, देशभरात श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधीसाठी राम भक्तांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातूनन समर्पण निधी दिला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचाही याकामी खारीचा वाटा असावा असा आमचा संकल्प आहे. शहरातील सर्व नागरिक, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत समर्पण निधी जमा करीत आहेत. तसेच, श्रीराम हे संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिर निर्माण निधीला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरवासीयांनी एकोप्याने हा निधी उभा केला. त्या सर्व लहान- थोरांचे मी आभार मानतो.