अहमदाबाद | झुंज न्यूज : गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसुख वसावा येथे भरूच मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
तसेच, मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे. त्यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
या पत्रात मनसुख वसावा यांनी लिहिले की, मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे.
“मनसुख वसावा हे हल्लीच्या काही विधानांमुळे चर्चेत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पत्र लिहून वसावा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे. याशिवाय स्टॅच्यु ऑफ युनिटीसंदर्भात वसावा यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले होते. मोदींना लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील इको सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती.”