मुंबई | झुंज न्यूज : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने तिचा साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. “पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा १८ जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीला होईल” असे मानसीने सांगितले.
“आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने ठरवले आहे” असे मानसीने सांगितले. मानसी नाईक आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाते. तिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.