शरद गोविंदराव पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० साली बारामती, पुणे येथे गोविदराव पवार आणि शारदाबाई पवार या दांपत्यांच्या घरी झाला. मराठी असून भारतीय राजकारणात स्वतः चा दबदबा निर्माण केला तो आजपर्यंत. इ.स.१९७८ ते इ.स.१९८०, इ.स.१९८८ ते इ.स.१९९२, इ.स.१९९३ ते इ.स.१९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स.१९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
लेखिका –
प्रा.अमिता कदम, ठाणे.
९८१९३९५७८८
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श त्यांचे आहेत. इ.स. १९५६ साली शालेय जीवनात ते गोवामुक्ती संग्रामात सहभागी झाले.या सत्याग्रहात त्यांनी पांठिबा दर्शविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता.आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू झाली. महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम पाहिले.विद्यार्थ्यां संघटनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. त्यावेळी पवार साहेब यांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले. आणि चव्हाणांनी सांगितले म्हणून ते युवक काँग्रेसमध्ये सहभागी झाले. चव्हाणांनी पवारांच्या रुपी कोहिनूर हिरा संपूर्ण भारताला दिला. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांना यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले.इ.स.१९६६ साली साहेबांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना इंग्लंड ,पश्चिम जर्मनी, फ्रान्स,इटली इ.देशांना भेटून तेथील राजकारणाचा आणि पक्षबांधणीचा चांगला अनुभव मिळाला आणि त्यांना त्याचा अभ्याससुद्धा करता आला.
सर्वप्रथम इ.स.१९६७ साली विधानसभेच्या निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून निवडून आले.वयाच्या २९ व्या वर्षी श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. इ.स.१९७२ आणि इ.स.१९७८ साली झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा विजयी झाले. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच वसंतदादा पाटील सुद्धा त्यांचे मार्गदर्शक होते. इ.स.१९८४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकला त्यापैकी बारामती या मतदारसंघाचा समावेश होता. मात्र असे असूनही त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणात राहायचे ठरवले. मार्च १९८५ साली राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या काळात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि ते राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
इ.स.१९८७ च्या साली ९ वर्षाच्या खंडानंतर शरद पवार यांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात प्रवेश केला. जून १९८८ साली पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शरद पवार यांची नेमणूक राजीव गांधी यांनी केली. २६जून १९८८ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करुन काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्ष अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली. पवार साहेबांनी आज महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण बदलून टाकले आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये पी.व्ही नरसिंह राव हे पंतप्रधान झाले आणि पवारांना त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ साली केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा प्रथमच शपथविधी झाला.त्यानंतर सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु अंतर्गत वादविवादामुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला आणि नरसिंह राव यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. अशा प्रकारे त्यांनी ६ मार्च १९९३ ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.
त्यानंतर काँग्रेस(इं) पक्षाबरोबर झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी १० जून १९९९ साली ” राष्ट्रवादी काँग्रेस” या पक्षाची स्थापना केली.१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. २००४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये सामील झाला.२२ मे २००४ साली शरद पवारांनी देशाचे कूषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली.२९ मे २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कूषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ मिळावा यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली. २९ नोव्हेंबर २००५ साली ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि १ जुलै २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
शरद पवार हे १२ डिसेंबर २०२० रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करणार. पण आजही त्यांच्यातील उत्साह तरुणपिढीला लाजवेल असा आहे. नवीन काही तरी करण्यासाठी त्यांची धडपड सतत सुरू असते. परंतु राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यात त्यांना अधिक आवड आहे आणि हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. पवार साहेब नेमके काय करणार आहेत हा नेहमीच कुतुहलाचा विषय आहे.राजकारणाची चक्रे ते कधी आणि कशी फिरवतील याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही. हे एक गूढ आहे आणि ते समजण्यासाठी खूप वर्ष निघून जातील तरी समजले याची शक्यता कमी आहे.
राजकारणातील कितीही किचकट प्रश्न असू दे तो प्रश्न साहेब शांतपणे सोडवतील.म्हणून तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा महाराष्ट्रात मिळाल्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही अशावेळी महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. महाराष्ट्रात सरकार नेमका कोणता पक्ष स्थापन करणार यावर तोडगा निघत नव्हता. महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. अशावेळी लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आणि सामान्य जनतेपासून ते राजकारणातील व्यक्तींना एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे आपले पवार साहेब. त्यांनी आता पुढाकार घ्यावा असे मत सर्वाचे झाले. आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या तीनही पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले.
साहेब आज ८० वर्षाचे झाले. पण आजही ते राजकारणात सक्रीय आहे.निवडणुकीदरम्यान आजही ते ऊन असो पाऊस कशाची तमा न बाळगता सभा घेतात. आणि आजही त्यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात. साहेबांचा वारसा आज सुप्रियाताई, अजितदादा आणि रोहितदादा पवार समर्थपणे चालवत आहेत. साहेबांनी अजून काही वर्षे तरी लोकांसाठी काम करावे ही लोकांची इच्छा आहे. आणि परमेश्वराने त्यांना निरोगी आयुष्य दयावे आणि साहेब करत असलेल्या कार्याने अधिक उत्तुंग भरारी घ्यावा ही सदिच्छा.
“महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि आमचे तरुणपिढीचे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!”