मुंबई | झुंज न्यूज : राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी दीर्घ संवाद साधला. तब्बल ३३ मिनिटाच्या या फेसबुक संवादातून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नांवर मतं मांडली. तसेच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मंदिरं कधी उघडणार असं मला गेल्या महिन्यांपासून विचारलं जात आहे. मंदिरं उघडणार ना. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर नियमावली करू. त्यानंतर मंदिर उघडली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. धार्मिकस्थळं उघडण्याची नियमावली सोपी आहे. मंदिरात जातानाही तोंडाला मास्क लावूनच जायचं आणि मंदिरात कमीत कमी गर्दी करायची हीच नियमावली आहे, असंही ते म्हणाले.
साधारणपणे घरातील आजी-आजोबा आदी ज्येष्ठ नागरिक मंदिरात जात असतात. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना आपण आतापर्यंत जपत आलो आहोत. त्यांच्या काळजीपोटीच धार्मिकस्थळं उघडण्यात थोडा उशीर होत आहे. पण तरीही माझ्यावर टीका होत आहे. पण तुमच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी मला त्याची पर्वा नाही. हा वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. पण उद्या जर तुमच्यावर गडांतर आलं तर टीका करणारे पुढे येणार नाहीत. तुमचं तुम्ही बघा. आम्ही तर तुम्हाला सांगितलंच होतं, असं हेच लोक म्हणतील. म्हणून मी सावध पावलं टाकत आहे, असंही ते म्हणाले.