नवी मुंबई | झुंज न्यूज : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आता अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात येत आहे. काहीवेळापूर्वीच पोलीस त्यांना घेऊन नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सुरक्षेच्या कारणास्वत पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आल्याचे समजते.
इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात ४ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अर्णव आणि इतर आरोपींना अलिबाग येथील नगरपालिकेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात अर्णव गोस्वामी यांनी उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात अनेकदा जामिन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
तर दुसरीकडे पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी होत आहे. यासंदर्भात आता ९ नोव्हेंबरला अलिबाग सत्र न्यायायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी बुधवारी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
पोलिसांना चकमा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन
अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.
अर्णव प्रकरणावरुन संजय राऊतांची भाजपवर आगपाखड
अर्णव गोस्वामी या वृत्तवाहिनीच्या मालकास पोलिसांनी ‘आत्महत्या’ प्रकरणात पकडताच अनेकांना चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याची उबळ आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेसाठी ज्यांनी मोहीम राबवली त्यांना त्यात गुन्ह्यात अटक झाली. तेव्हा तो वृत्तपत्र स्वातंत्यावर हल्ला कसा करु शकतो? वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.