शिरूर I झुंज न्यूज : शिवसेना शिरुर तालुका प्रमुख सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार यांची ‘आमदार अशोक पवार यांचेकडून माझ्या जिवीतास धोका…’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेली पोस्ट मधील मजकूर…!
आज दिनांक ०६/११/२०२० रोजी आपल्या घोडगंगा सह. सा.का चे पुण्यात असलेल्या सभासदांची साखर वाटप गुप्ते मंगल कार्यालय येथे चालू झाली. सदर ठिकाणी मी स्वतः सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार शिवसेना तालुका प्रमुख शिरूर, संचालक घोडगंगा कारखाना, ॲड सुरेशराव पलांडे व काकासाहेब खळदकर गेलो असता त्याठिकाणी साखर वाटप चालू होती. येणाऱ्या सभासदांना मी भेटत असताना आमदार अशोक पवार, जि.प.सदस्या सुजाता पवार, सचिन तौर, संदिप तौर व त्याच्या घरातील महिला हे सर्व लोक त्याठिकाणी होते. या ठिकाणी सभासदांना चहा नाष्टा पेढे दिले जात होते.
मी एका ठिकाणी बसलेलो असताना माझ्याजवळ येऊन आमदार अशोक पवार यांनी ये माकडा तु इथे कशाला आलास असे बोलुन मला दमबाजी सुरू केली. आमच्यात शाब्दिक बाचाबाची चालु असतानाच आमदार अशोक पवार यांचेसह जि प सदस्या सुजाता पवार, व्यंकटेशकृपा या खासगी कारखान्याचे चेअरमन संदिप तौर, समीर पवार, सचिन तौर व इतर ५/६ लोक माझ्या अंगावर धावून आले. मला मारण्याची भाषा करु लागले. मी जागेवरच बसून राहिलो. व मारायचे असेल तर मला मारा, अशी भूमिका घेतली. त्यावेळेस ॲड सुरेशराव पलांडे व काकासाहेब खळदकर यांनी मध्यस्थी करुन अनुचित प्रकार टाळला.
आपणा सर्वांना माहिती आहे की, घोडगंगा साखर कारखान्यात होणारा भ्रष्टाचार व आमदार अशोक पवार यांनी कारखान्याची ५ एकर जमीन हडप केली त्या विरोधात माझे बंधु संतोष फराटे व इतरांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांचे चेअरमन व संचालक पद रद्द झाले आहे. घोडगंगा कारखान्यातील अनेक चुकीच्या बाबी मी सभासदांसमोर आणल्या आहेत याचा राग मनात धरून ते सर्वजण माझ्या अंगावर धावून आले. मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
झालेला प्रकार पहाता व या लोकांचा आवेश पहाता आमदार अशोक पवार व त्यांच्या नातेवाईंकाकडून माझ्या जिवितास धोका निर्माण झाला असून वरिष्ठांच्या कानावर सदर झालेला प्रकार घालणार आहे असे सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार यांनी म्हणले आहे .
दरम्यान, सुधीर फराटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘वरिष्ठांशी चर्चा करून पोलिसांकडे गुन्हा दाखल करणार आहे.’ अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सुधीर फराटे यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. फक्त प्रसिद्धीसाठी केलेला हा एक स्टंट आहे. व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून अपलोड केला आहे. संपूर्ण व्हिडिओ का अपलोड केला नाही?’ पण, व्हायरल झालेल्या शिरूर तालुक्यात चर्चांना उधान आले आहे.