नवी दिल्ली I झुंज न्यूज : उद्यापासून देशभरात दररोजच्या गोष्टींचे नियम बदलणार आहेत. त्यात असे काही बदल आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशात होणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यासंबंधित माहिती देत आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते. एलपीजी सिलिंडरपासून रेल्वेच्या टाइम टेबलपर्यंत सर्व गोष्टी १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या नवीन नियमांबद्दल…
१) एलपीजी(LPG) वितरण नियम बदलतील :
१ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरण नियमात बदल होणार आहेत. तेल कंपन्या १ नोव्हेंबरपासून डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) प्रणाली लागू करणार आहेत. म्हणजेच गॅस वितरणापूर्वी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल. जेव्हा सिलिंडर आपल्या घरी येईल तेव्हा ओटीपी डिलिव्हरी बॉयबरोबर शेअर करावा लागेल. जेव्हा ओटीपी सिस्टम एकमेकांशी जुळेल तेव्हाच सिलिंडर वितरित केला जाईल.
२) इंडेन गॅसने बुकिंगचा नंबर बदलला :
आपण इंडेनचे ग्राहक असल्यास, यापुढे आपण जुन्या क्रमांकावर गॅस बुक करू शकणार नाही. इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर गॅस बुकिंगसाठी एक नवीन नंबर पाठविला आहे. आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.
३) गॅस सिलिंडरच्या किंमती बदल :
राज्यातील तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवल्या जातील. किंमती वाढू शकतात किंवा दिलासादेखील मिळू शकतो. अशा परिस्थितीत १ नोव्हेंबरला सिलिंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ केली.
४) रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल :
रेल्वेने प्रवास करणार्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. १ नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे १३ हजार प्रवासी आणि ७ हजार मालवाहतूक करणार्यां गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. १ नोव्हेंबरपासून देशातील ३० राजधानी गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलणार आहे. त्याचबरोबर तेजस एक्स्प्रेस चंदिगड ते नवी दिल्ली दरम्यान धावेल आणि १ नोव्हेंबरपासून दर बुधवारी सुटेल.
५) एसबीआय(SBI) बचत खात्यावर कमी व्याज मिळणार :
१ नोव्हेंबरपासून एसबीआयचे काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. एसबीआय बचत खात्यांवर कमी व्याज मिळेल. आता १ नोव्हेंबरपासून बचत खात्यावर १ लाख रुपयांपर्यंत ०.२५ टक्के व्याजदर कमी करून ३.२५ टक्के केले जाईल. तर १ लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.