पुणे I झुंज न्यूज : चांदणी चौकातील एनडीए व बावधनला जोडणाऱ्या पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामास सोमवारी (ता. ३) रात्री साडेबारा वाजता सुरवात झाली. नियोजित वेळेनुसार आतापर्यंत एकूण चार गर्डर बसविण्यात आले आहेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३०० टनाच्या दोन क्रेनचा वापर केला. टाकलेला गर्डर हा ५८ मीटर लांबीचा, तर १५० टन वजनाचा आहे. गर्डरच्या कामासाठी १५० कामगारांचे हात झटले. ‘पुलर’ नावाच्या वाहनातून गर्डरची वाहतूक करण्यात आली.
पुढील नऊ दिवस नऊ गर्डर टाकले जाणार आहेत. गर्डरचे काम पूर्ण झाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम केले जाईल. हे काम पुढील सहा ते सात दिवस चालेल. ३१ जुलैपर्यंत चांदणी चौकातील सर्वच कामे पूर्ण करू, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी व्यक्त केला.
बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. पूर्वीचा पूल हा ५० मीटर लांबीचा व २० मीटर रुंदीचा होता. पूर्वीच्या तुलनेत पुलाची लांबी व रुंदी वाढली आहे. तसेच पुलाखाली पूर्वीप्रमाणे पिलर नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही. पुलाच्या मजबुतीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूलाच पिलर उभे केले आहे.
सदरचे काम ४ जुलै ते १५ जुलै या दरम्यान करण्यात येत आहे. नमूद वेळी देहूरोड, वाकड नाका, राधा चौक व चांदणी चौक या ठिकाणी जड वाहतूक वळविण्याच्या अनुषंगाने डायव्हर्शन पॉईंट करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एन एच ए आय प्रकल्प प्रमुख, एनसीसी अधिकारी, अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पिंपरी चिंचवड व एसीपी, वाहतूक, पिंपरी चिंचवड तसेच बावधन वाहतूक विभाग, प्रभारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेण्यात आली होती. त्यानुसार कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
नमूद वेळी नागरिकांना व वाहन चालकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. तसेच पोलीस उपायुक्त श्री काकासाहेब डोळे, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वाहतूक विभागाला दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार वाहतुकीचे नियमन करण्यात येत आहे. तसेच नमूद कामासाठी शिव सेक्युरिटी सर्विसेस या सेक्युरिटी कंपनीचे कर्मचारी वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांना मद मदतिकरता नेमलेले आहेत.
ऐतिहासिक गर्डर टाकण्याचे काम बघण्याकरता काही प्रमाणात नागरिक देखील येत आहेत. येत्या १५ जुलैपर्यंत गर्डर टाकण्याचे काम सुरू राहणार असून वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.