पुणे : संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी सामाजिक व राजकीय संघटनांनी पुरंदर केल्याच्या पायथ्याशी आंदोलन केले होते.
शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे .
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अशा पद्धतीने वापरले जाऊ नये, यासाठी संघटनांनी अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरमध्येही संभाजी बिडी विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. म्हणजेच संभाजी बिडीऐवजी नवीन नाव रजिस्टर केले जाईल. जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. याचबरोबर आमच्या ग्राहकांची साखळी न तुटता शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल व या उद्योगात असलेल्या ६० ते ७० हजार विडी कामगारांच्या प्रपंचावरही कुऱ्हाड येणार नाही, असे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.