(प्रतिनिधी : शशिकांत जाधव)
तळवडे I झुंज न्यूज : येथील राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, तसेच या उपक्रमाची जनमाणसात जागृती व्हावी म्हणून विद्यालयाच्या वतीनं प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने तळवडे गावठाण परिसरात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची जागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर ‘हर घर तिरंगा, मन मन तिरंगा!, तिरंगा हमारी शान है, घर घर में तिंरगे का मान है, तिरंगा आमचा स्वाभिमान, तिरंगा आमचा अभिमान!, अशा विविध घोषणा देत, तसेच विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेषभूषा केलेले विद्यार्थी तसेच विविध घोषवाक्याचे फलक घेत सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी प्रवृत्त केले.
भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्ष झाली, त्यानिमित्ताने विद्यालयात अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास शिंदे यांनी सांगितले.यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधुरी राऊत उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष उंबरदंड यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.