निसर्ग संवर्धनाच्या संस्काराचे बीज रुजले – अभिनेते सयाजी शिंदे
( प्रतिनिधी : संतोष चव्हाण)
जाधववाडी I झुंज न्यूज : चिखली येथील श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखली वृध्दाश्रमात आरंभ फाउंडेशने छत्रपती शिवाजी महाराजांची बीज तुला करून सह्याद्री देवराईला बिया सुपूर्त केल्या. आरंभ फाउंडेशने बीज संकलन मोहीम घेतली होती त्याला महाराष्ट्रातून अनेक निसर्गप्रेमी, शाळेतील विद्यार्थी यांनी चांगल्या प्रतिसाद देऊन अनेक देशी झाडांच्या बिया दिल्या. ३३ प्रजातीच्या असंख्य बिया दिल्या. त्या बियांची छत्रपती शिवाजी महाराजांची बीज तुला अभिनेते सयाजी शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (संस्थापक अध्यक्ष सह्याद्री देवराई फाउंडेशन) तसेच ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा सर, यशवंत लिमये उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार आरंभ फाउंडेशनचे सचिव विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील म्हणाल्या,
सयाजी सरांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने अनेकांना निसर्ग संवर्धन कार्याला जोडण्यासाठी ही मोहीम हाती घेतली. अनेक शाळांना निवेदन दिले निसर्गप्रेमींना आव्हान केले आणि अनेकाने आपापल्या भागातून देशी झाडांच्या बिया संकलित करून त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारत असताना महाराजांचे निसर्ग संवर्धनाचे विचार त्यांच्या आज्ञापत्रातून व्यक्त होते. हाच विचार सर्वांपर्यंत पोचला पाहिजे.”
यावेळी संकलन केलेल्या बियाच प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी निसर्ग प्रेमी सोमनाथआबा मुसूडगे, जगजीवन राम कातखेडे, अनिल निंबोलकर, सुरेश देसाई ,अर्जुन मेंदणकर सुभाष पाटील , तानाजी भोसले, निलेश साळुंखे, डॉ. सायली कुलकर्णी ,शांताराम बोबडे ,अमोल गाडेकर सुहास कडू ,रुक्मिणी मुळे तसेच दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारीत विद्यालय चिखली, ब्लॉसन पब्लिक स्कूल ताथवडे, कृष्णराव भेगडे स्कूल तळेगाव दाभाडे, जिल्हा परिषद शाळा देगाव अकोला यांना निसर्गसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पर्यावरण पूरक उपक्रम राबवणाऱ्या दादा महाराज नाटेकर विद्यालयचा प्रांगणामध्ये विष्णू लांबा सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक निसर्गप्रेमी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
“शाळेतील विद्यार्थ्यांना या कार्यात घेण्यासाठी निसर्ग संवर्धनाच्या संस्काराचे बीज रुजले पाहिजे. झाडापेक्षा कोणीच मोठा नाही. तोच सर्वस्व आहे. ज्या चिमुकल्या हातानी आज बिया गोळा केल्या त्यांना निसर्ग भरभरूनच देणार असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.