ती रात्र खरंच वैऱ्याची होती ! असे सांगत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी …त्या दिवसांची अंगावर काटे आणणारी व थरकाप उडविणारी घटना पोस्ट द्वारे सांगितली आहे. काय होती ती घटना जाणून घ्या त्यांच्याच शब्दात…
“ती” रात्र मी आजही विसरलो नाही.. आम्ही तेव्हा अलिबागला ब्राह्मण आळीत राहायचो.. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेसह तहसिल, पोलीस स्टेशन, कोर्ट, कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिस ही सारी सरकारी कार्यालयं या परिसरातच..समुद्र ही घराला लागूनच.. समुद्राच्या लाटांचा आवाज सहज कानी पडायचा.. दिवसभर या भागात बरीच वर्दळ असते. .. रात्री सात नंतर मात्र सारी सामसुम.. आमचं घर कोएसोच्या समोरच.. तळ मजल्यावर.. अगदी रस्त्यावर.. पण कधी भिती अशी वाटली नाही.. एकतर अलिबाग एक सुसंस्कृत शहर..आपल्याच मस्तीत जगणारं.. क्राइम जवळपास शून्य.. .. अगदी साईकल चोरीच्या गुन्ह्याची नोंद देखील महिना, महिना पोलिसात व्हायची नाही.. जे काही राडे व्हायचे ते राजकीय .. त्यामुळे रात्रीचा निर्मनुष्य परिसर आणि रस्त्यावर घर असलं तरी आम्ही बिनधास्त असायचो.. .. मला ऑफिस मधून यायलाही दररोज बारा-एक वाजायचे.. मात्र धास्ती वाटावी असं कधी काही घडलं नव्हतं.. सारं अलबेल..मस्त चालायचं..
“ती” रात्र मात्र नेहमी सारखी शांत शांत नव्हती..खरया अर्थानं वैरयाची रात्र होती ती.. मी दररोज प्रमाणे रात्री बारा – सव्वा बारा वाजता सीटी एडिशन देऊन घरी आलो.. जेवण आटोपून एक – सव्वा वाजता आम्ही झोपलो.. दिवसभरचे ताण-तणाव झोप लगेच लागायला पुरेसे होते.. लगेच गाढ झोप लागली.. साधारण पावणेतीनच्या सुमारास दरवाजावर कोणी तर नॉक करतंय असं वाटलं.. .. भास झाला असेल असं समजून तसाच पडून राहिलो.. दोन मिनिटांनी पुन्हा दरवाजावर टकटक झाली.. खडबडून जागा झालो.. घड्याळात पाहिलं तर पावणेतीन वाजलेले ..कळत नव्हतं एवढ्या रात्री, अवेळी कोण आलं असेल ते? विचारात मग्न असतानाच पुन्हा दरवाजा वाजला.. कोण आहे? असा आवाज मी दिला.. तिकडूनच उत्तर आलं.. “मीच आहे, दरवाजा उघडा” हा आवाज महिलेचा होता.. या आवाजानं मी आणि शोभनाच्या काळजाचं पाणी – पाणी झालं.. मी भूत-प्रेत असलं काही मानत नाही.. तरीही एक पुसटशी शंका मनाला चाटून गेली.. नेमकं त्याच वेळेस शोभनाला आज अमावस्या असल्याचं आठवलं.. मग तर दोघेही गर्भगळीत .. तरीही मनाच्या हिय्या करून उठलो, “आय होल” मधून बाहेरचा अंदाज घेतला.. बाहेरचं दृश्य अंगाचा थरकाप उडविणारं होतं….
ज्या महिलेनं आवाज दिला ती अगदी दरवाजात उभी होती.. अंगावर घोंगडी टाइप काही घेतलेलं किमान पाच पुरूष मागे थोड्या अंतरावर उभे होते .. चेहरे स्वाभाविकपणे झाकलेले.. हातात तलवारी सारखी हत्यारं .. प्रकार काय असू शकतो हे क्षणात लक्षात आलं.. ही माणसं चोरीसाठी आली असती तर त्यांनी असा दरवाजा ठोठावून, आम्हाला जागं करण्याचं काही कारण नव्हतं . उद्देश आमच्यावर हल्ल्याचाच होता… महिलेचा आवाज आहे.. सहानुभूती म्हणून आम्ही लगेच दरवाजा उघडू आणि मग आपला कार्यभाग साधता येईल असं नियोजन असावं…
मात्र आम्ही दरवाजा उघडला नाही.. उलट फोन उचलला.. अगोदर एस. पीं. ना फोन लावला. ..माधवराव कर्वे तेव्हा जिल्हा पोलीस प़मुख होते. चांगले साहित्यिक, उत्तम वक्ते असलेले कर्वे साहेब एक सज्जन पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात.. ते आमच्याच पंथातले असल्याने त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती.. एवढ्या रात्री फोन केल्यानंतर ही दुसरया रिंगलाच त्यांनी फोन घेतला.. घाबरलेल्या अवस्थेतच त्यांना मी किती मोठ्या संकटात सापडलोय ते सांगितलं.. “पोलीस पाठवा” अशी विनंती केली.. मी फोनवर बोलत असताना ही दरवाजावर केवळ थापाच नाही तर आता लाथाही पडत होत्या.. मी पोलिसांना फोन करतोय हे त्यांच्या ही लक्षात आलं असावं.. त्यामुळं चिडून ते दरवाजावर लाथा आणि हातातील हत्याराने वार करीत होते.. हा सारा गोंधळ एकूण खरं तर बिल्डिंग मधील आणि आसपासच्या लोकांनी मदतीला येणं अपेक्षित होतं.. आलं कोणी नाही..घरात आम्ही दोघंच आणि दोन चिल्ले – पिल्ले… मी पाच मिनिटांनी पुन्हा अलिबाग पोलिस स्टेशनला फोन केला.. हे पोलीस स्टेशन माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर.. माझा फोन जाण्यापूर्वी कर्वे साहेबांचा फोन तिकडे गेला होता.. पोलीस गाडी निघालीच होती.. सायरन वाजवत दोनच मिनिटात गाडी माझ्या दारात पोहोचली.. तोपर्यंत ती महिला आणि तिच्या बरोबरचे पाचही जण पसार झाले होते…
पोलिसांनी जवळपासच्या सर्व गल्ली – बोळा तपासल्या.. त्यांचा पत्ता लागला नाही.. पोलीस आल्यावर भेदरलेल्या अवस्थेतच आम्ही दरवाजा उघडून बाहेर आलो.. घटना घडून गेल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचतात हा अनेकांना आलेला अनुभव.. आम्ही भाग्यवान यासाठी की काही अनुचीत घडण्यापूर्वीच पोलीस हजर झाले होते.. आम्ही पोलिसांचे आभार मानले… एका मोठ्या संकटातून आम्ही सहीसलामत सुटलो होतो.. म्हणतात ना, “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती ” .. आमच्या बाबतीत तसं घडलं होतं.. पोलीस आल्यावर आजुबाजुचे लोक ही जमा झाले.. मग पहाटे पाच वाजेपर्यंत हीच चर्चा, कोण असतील ? का आले असतील ? वगैरे.वगैरे .हा सारा प्रसंग आजही डोळ्यासमोर एखाद्या चलचित्रा प़माणे येतो.. समजा झोपेत अनावधानाने दरवाजा उघडला गेला असता तर? काय झालं असतं.. कल्पना करवत नाही.. आज हे सारं आठवून भलेही “ओ भी क्या रात थी” असं वाटत असलं तरी तेव्हा सारं जिवावर बेतलं होतं..
कोण ? का ? या प्रश्नांचा गुंता तर माझ्याही डोक्यात निर्माण झाला होता.. मी संपादक होतो.. दररोज अनेकांशी पंगा घ्यावा लागायचा.. मालकांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध सांभाळलाना कोण, केव्हा, कुठे दुखावले जाईल ते सांगता येत नव्हतं..जे आले होते ते चोरीच्या उद्देशानं तर नक्कीच आले नव्हते.. मला जागं करून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करायचा होता की, केवळ आम्हाला भिती घालायची होती? काही कळत नव्हतं.. दिवस लोकसभा निवडणुकांचे होते.. आणि त्याच वेळेस माझं “टु फेसेस ऑफ जनाब अंतुले” हे पुस्तक रायगडमध्ये धुमाकूळ घालत होतं..त्या काळात अंतुलेंना रायगडात चांगलाच दबदबा होता.. त्यांच्या विरोधात लिहायची कोणी फारशी हिंमत नसे.. अशा स्थितीत भडक शिर्षक असणारे पुस्तक लिहायचे म्हणजे मोठीच जोखीम होती.. ती मी पत्करली होती.. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पेण येथील जाहीर सभेत” अंतुले समजून घ्यायचे असतील तर एस.एम. देशमुख यांचे पुस्तक वाचा” असं सांगितल्यामुळे पुस्तकाच्या तीन आवृत्या हातोहात संपल्या होत्या.. माझ्या घरावर जो राडा झाला त्यामागे या पुस्तकाची काही भूमिका होती काय? मला तेव्हाही सांगता आलं नव्हतं.. आजही सांगता येणार नाही…. कोणताच पुरावा नसल्याने विशिष्ट व्यक्ती, पक्ष किंवा कोणाकडं बोट दाखवणं योग्य नव्हतं… नाही.. .. त्यामुळे ही घटना चघळत बसायचं नाही.. किंवा घटनेचं भांडवल करून “हिरोगिरी” ही करायची नाही असं मी ठरवून टाकलं.. केलंही तसंच..माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याची मी बातमी दिली नाही.. पोलिसात तक़ारही दिली नाही.. पोलिसांच्या माहितीसाठी केवळ एक पत्र दिलं.. या घटनेकडे दुर्लक्ष करण्यामागे माझा एक उद्देश होता..
ज्यांनी कोणी हल्लेखोर पाठविले होते त्यांना मी संदेश देऊ इच्छित होतो की, “मी तुमच्या अशा धमक्यांना भिक घालत नाही मी घाबरत नाही किंवा हल्ल्याच्या भिकीनं मी पळूनही जाणार नाही”.. त्यामुळे मी माझं रूटीन सुरू ठेवलं होतं.. उलट बातम्या, माझा कटाक्ष, अग़लेख याला अधिक धार आली होती.. जे घडलं ते जवळच्या दहा – वीस लोकांनाच माहिती होतं.. .. प्रोटोकॉल म्हणून झाला प्रकार मालकांच्या कानावर घातला.. त्यांनी तो विषय गांभीर्यानं घेणयाचंही कारण नव्हतं.. मी मराठवाडयातून दूर अलिबागला गेलेलो, काही झालं असतं तर मागं रडणारं देखील कोणी नव्हतं.. तरीही मी घाबरलो नाही, खचलो नाही, हिंमत हरलो नाही.. अधिक कणखरपणे, जोमानं लोकहिताची पत्रकारिता करीत राहिलो.. ही घटना घडल्यानंतर जवळपास तेरा वर्षे मी अलिबागला होतो..
पोलिसांना मात्र या घटनेमागचे धागेदोरे सापडले असावेत असं वाटतं.. कारण सकाळी डीवायएसपी काशीनाथ मिसाळ हे माझ्या घरी आले.. पल्लेबाज मिशा आणि उग्र चेहरयाचे मिसाळ एक कर्तव्य कठोर आणि चांगले पोलीस अधिकारी होते.. अफाट वाचन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे मिसाळ हे माझे चांगले मित्र ही होते.. घराची सगळी पाहणी करून झाल्यावर सुरक्षेच्यादृषटीनं दरवाजे, खिडक्यांना ग्रील बसवून घेण्याची सूचना त्यांनी केल्या .. त्यानंतर साडे दहा अकरा वाजता माधवराव कर्वे स्वतः घरी आले..
मला पोलीस संरक्षण ही देण्यात आलं.. पण चार दिवसात मी कंटाळलो.. पोलीस संरक्षण मागं घेण्याची विनंती मी एसपी साहेबांना केली.. मग कोणी तरी सूचना केली रिव्हॉल्वर घ्या.. मी देखील तावातावात अर्ज केला…पोलिसांनी अर्ज शिफारशींसह कलेक्टरांकडे पाठविला.. बहुधा तेव्हा रघुनाथ राठोड कलेक्टर होते.. त्यांनी लगेच मला लाइसन्स दिलं.. पण प्रत्यक्षात माझी रिव्हॉल्व्हर घेण्याची हिंमतच झाली नाही.. लाइसनचे 8 वर्षे नुसतेच नूतनीकरण करीत राहिलो.. रिव्हॉल्व्हर घेतला नाही.. “तेव्हा रिव्हॉल्व्हर पेक्षा लेखणीची ताकद मला जास्त वाटायची” ..रिव्हॉल्व्हरचं ते लाईसन आजही माझ्या कपाटात धूळ खात पडून आहे..
एस.एम.देशमुख
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!