पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडमधील महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, तर पगार मिळणार नाही, असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. याच धर्तीवर प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्यांएवढी किंवा किमान एक झाड लावण्याचे बंधनकारक करावे. तसा आदेशच महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी काढावा, अशी मागणीवजा विनंती वृक्षमित्र अरुण पवार यांनी केली आहे.
अरुण पवार यांनी सांगितले,
की मागील वर्षभरापासून कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यावर्षी रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागा मिळत नव्हती. ऑक्सिजनअभावी रुग्णांवर उपचार करताना मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे यातून धडा घेऊन प्रत्येकाने एक झाड लावून आयुष्यभर ऑक्सिजन फुकट मिळवता येईल. केवळ वृक्षारोपण करुन चालणार नाही, तर ती झाडे जगविणे आवश्यक आहे.
यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जसे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरच पगार मिळेल अशी भूमिका घेतली. अगदी तशीच भूमिका वृक्षारोपणा संदर्भात घेतली तर मोठ्या शहरांचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार आपल्या अधिकारात हा उपक्रम राबवू शकतात. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने किमान एक झाड लावून जगवले, तर लाखो झाडांचे रोपण होऊन सर्वत्र हिरवळ दिसेल. पर्यायाने पर्यावरणात मुबलक ऑक्सिजन निर्मिती होईल. जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. झाडे हे पर्यावरणाचे फुप्फुस आहेत. संबंध जीवासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे.
“प्रत्येकाने एक झाड लावले, तरी वर्तमानासह भविष्यात येणाऱ्या गंभीर संकटावर मात करणे शक्य होईल. यासाठी दूरदृष्टी, इच्छाशक्ती, निसर्ग प्रेम आणि सेवाभावी वृत्तीची आवश्यकता आहे. तरच ही पर्यावरणाची फुफ्फुसे टिकून मानवाची फुफ्फुसे कार्यरत राहतील, असेही वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले.