अहमदनगर | झुंज न्यूज : अहमदनगर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सागंली आणि जळगाव पाठोपाठ भाजपनं तिसरी महापालिका गमावली आहे. अहमनगर महापालिकेत भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौर तर राष्ट्रवादीच्या गणेश भोसले यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करताना नगरचे राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप तर राष्ट्रवादी आणि सेनेचे नगरसेवक यांची उपस्थिती होती.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या भेटीत महाविकास आघाडीचं ठरलं अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 22 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झालं होतं.
शिवसेनेला महापौरपद तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद
अहमदनगर महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असं सूत्र निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या वतीने नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. शेंडगे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.
आज राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौरपदी गणेश भोसले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. मात्र विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं निवडणूक बिनविरोध पार पडली.
गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
अहमदनगर महापालिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागतात.
अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- 23
राष्ट्रवादी-18
भाजप-15
काँग्रेस-5
बसपा-4
सपा-1
अपक्ष-2