आंबेगाव I झुंज न्यूज : रविवार दिनांक २७ जून रोजी लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील शिवनेरी निवासस्थानी जनता दरबार संपन्न झाला. यावेळी विविध तालुक्यातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळांनी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. या विषयी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून जनता दरबारात झालेल्या चर्चेचा आढावा मांडला आहे.
काय म्हणले आहे सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये ?
पिंपरखेड, ता.शिरूर येथील ग्रामस्थांसोबत झालेल्या भेटीमध्ये या ठिकाणी गावामध्ये सभामंडप बांधकामासाठी ७ लक्ष रुपये प्रस्तावित केले असून त्यास लवकरच मंजुरी मिळून ग्रामस्थांची मागणी पूर्ण करणार असल्याची माहिती दिली. कोवीड सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सलग अकरा महीने शासन कराराद्वारे कामावर सामावून घेण्याची तसेच शासन भरतीप्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी केली. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.
राजगुरुनगर शहरातील आशानंद रेसिडेन्सी सोसायटीमधील रहिवाशांनी माझी भेट घेऊन सोसायटीमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. तसेच संबंधित डेव्हलपने याबाबत सोसायटीधारकांची फसवणूक केल्याची तक्रार केली. याबाबत राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्याधिकारी श्री पाटील यांनी महिन्याभरात येथील पाणीपुरवठा नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल असे सांगून आश्वस्त केले. रहिवाशांच्या आग्रहानुसार या भागात प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक समस्या सोडविणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.
शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी गावच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन गावामध्ये महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गंभीर व घातक प्रदूषणाबाबतची माहिती दिली. तसेच ही कंपनी या भागात होऊ नये यासाठी तीव्र विरोध दर्शविला. सदर कंपनीच्या घातक सांडपाण्यामुळे गावातील विहिरी व पाण्याची तळी दूषित होऊन जनावरे दगावली आहेत, नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असून या भागातील शेती नापीक होत आहे अशा विविध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी ग्रामस्थांनी माझ्यापुढे मांडल्या. याबाबत मी व्यक्तिशः लक्ष देऊन या भागाचा आठवड्याभरात अधिकाऱ्यांसोबत दौरा करणार आहे. तसेच येथील नागरिकांचे आरोग्य व हित लक्षात घेऊन या जटिल समस्येबाबत मंत्रालयीन स्तरावर योग्य त्या हालचाली होणेकामी पाठपुरावा करणार आहे.
शेलू, ता.खेड येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. येथील शिवसेना शाखा कार्यालय बांधण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांना सांगितले. अक्षय गाडे या युवकाची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. लांडेवाडी गावच्या उपसरपंचपदी भास्कर पाबळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
खेड तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी बागायती जमिनींचे संपादन करण्यात येऊ नये यासाठी माझी भेट घेतली. येथील बाधित शेतकरी व शासन प्रशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात यासाठी मी नगरविकास व बांधकाम मंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याबद्दल ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले. भविष्यातील गरजा व नागरी हितासाठी मोठे प्रकल्प उभे राहणे गरजेचे असते, हे प्रकल्प होताना या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संपादन केले जावे हि माझी अगदी सुरुवातीपासूनची भूमिका आहे.
प्रकल्पांना चालना देण्याबरोबरच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने माझे प्रयत्न अखंड सुरू राहणार आहेत. याकरिता माननीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित वरिष्ठ अधिकारी, बाधित शेतकर्यांचे शिष्टमंडळ यांच्यात मंत्रालय स्तरावर बैठक व्हावी यासाठी मी आग्रही असल्याचे व त्यादृष्टीने आवश्यक प्रयत्न करीत असल्याचे यावेळी उपस्थित शेतकरी शिष्टमंडळाला सांगितले.
याशिवाय भेटीसाठी आलेल्या विविध भागातील नागरिकांचे प्रश्न व वैयक्तिक कामे समजावून घेऊन शक्य तितकी कामे सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. झालेल्या जनता दरबारामध्ये खासकरून अकोले तालुक्यातील पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन विकासाचा राजमार्ग ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित रेल्वेला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल माझ्या केलेल्या सन्मानाबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे.
माझा दुरान्वये संबंध नसलेल्या अन्य तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी माझी भेट घेऊन या प्रकल्पाबाबत व्यक्त केलेल्या भावना म्हणजे माझ्याकामाची पोचपावती आहे असेच मी समजतो. यावेळी अकोले तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्टेशन व्हावे या अकोले रेल्वे मार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या मागणीबद्दल मी पुढील पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहे. धन्यवाद.
आपला,
शिवाजीराव आढळराव पाटील
शिवसेना उपनेता, संपर्कप्रमुख, मा.खासदार शिरूर लोकसभा