उस्मानाबाद | झुंज न्यूज : कोरोनामुळे राज्यात हाहा:कार उडाला आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे औषधी तसेच इतर आरोग्य व्यवस्था कमी पडत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर तसेच इतर औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उस्मानाबाध्ये चक्क मृतदेहांची अदलाबादल झाली आहे. एवढेच नाही तर एकाच महिलेचा मृतदेह दोन वेळा देण्यात आलाय. या प्रकारामुळे येथील आरोग्य प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
एकाच महिलेचा दोन वेळा मृतदेह दिला
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली येथील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनासदृश लक्षणे आढळली होती. त्यानंतर या महिलेची चाचणी केल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालायात उपचार सुरु होते. मात्र, उपचाराला साथ न दिल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन जाण्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या सांगण्यावरुन मृत वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला. तसेच या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे समोर आल्याने खळबळ
दरम्यान, ७० वर्षीय मृत वृद्ध महिलेचे अत्यंस्कार केल्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून ५ मे रोजी पुन्हा एकदा कॉल आला. यावेळी तुमच्या नातेवाईकांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आहे तो घेऊन जा असे सांगण्यात आले. या फोन कॉलमुळे मृत महिलेच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन दिवसांपूर्वीच अंत्यविधी केल्यानंतर पुन्हा आजीचा मृतदेह शाबूत कसा हा प्रश्न महिलेच्या घरच्यांना पडला. त्यानंतर मृत महिलेच्या घरच्यांनी रुग्णालयात असलेल्या महिलेचा फोटो मागवला. रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह त्यांच्याच आजीचाच असल्याचे नंतर समजले. या प्रकारानंतर वृद्ध महिलेचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले आणि त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी विचारपूस केल्यानंतर मृतदेहांची आदलाबदल झाल्याचे समोर आले.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय प्रशासनावर नागरिकांकडून गंभीर टीका होत आहे. मृतदेहाची आदलाबदल होण्याचा प्रकार गंभीर असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळले जात आहे, असे नातेवाईकांनी आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हायला हवी अशीसुद्धा मृत वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.