चंद्रपूर I झुंज न्यूज : राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज नागपुरात करोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती.
मागील ६ दिवसांपासून उपचार, अचानक हृदयविकाराचा झटका
संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.
संजय देवतळे यांची राजकीय कारकीर्द
संजय देवताळे यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ते ४ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपत नुकताच प्रवेश केला होता.
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
‘राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असून, या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.