बुलडाणा | झुंज न्यूज : चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर साखरपुडाही पार पडला. त्यानंतर नवरदेवाने नवरीच्या डोळ्यात दोष असल्याचं सांगत आढेवेढे घेतले. त्यामुळे संतापलेल्या वधूपक्षाने नवरदेवाला बंद खोलीत धू-धू धुतला. खापरखेडाच्या नवऱ्या मुलासह त्यांच्या नातेवाईकांचाही ‘पाहुणचार’ घेण्यात आला. अकोल्यातील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चार वेळा पाहणी करुन पाहुणचाराचा मोठा फटका आणि मनस्ताप मुलीच्या कुटुंबाला दिल्यावर पाचव्यांदा मुलीत खोट काढणाऱ्या बिलंदर नवऱ्या मुलाला कपडा घेण्याच्या बहाण्याने बोलावून वधूपक्षाने बंद खोलीत बदडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवरीच्या डोळ्यात व्यंग असल्याचा निरोप
अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील मुलाचे हे प्रताप असल्याचे बोलले जात आहे. नांदुरा तालुक्यातील अलमपूर गावातील मुलीच्या सोयरीकीचा हा किस्सा सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. चार वेळा पाहणी केल्यावर मुलाने मुलीच्या डोळ्यात काहीतरी व्यंग शोधले. हा निरोप मध्यस्थामार्फत मुलीच्या कुटुंबापर्यंत पोहोचवताच तिकडे तळपायाची आग मस्तकात पोहोचली.
वधूपक्ष चिडला, भिडायचं ठरलं
आता लग्नाचा मुहूर्त काढण्याची वेळ येत असताना मुलाने मध्येच काय काढले? चार वेळा मुलगी बघायचा कार्यक्रम झाला आणि साखरपुडा आणि शिदोरी झाली, तेव्हा काय या लोकांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या काय? असा सवाल उपस्थित झाला. हुंडा वाढवून मागण्यासाठी तर हे नखरे नसावेत ना? असा संशय आल्याने नवऱ्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना अद्दल घडवण्याचे नियोजन झाले.
नवरदेवाला बोलावून बंद खोलीत धुलाई
मध्यस्थामार्फत पुन्हा पाहणी आणि कपडा घेण्यासाठी मुलाला बोलावून घेण्यात आले. बंद खोलीत त्याची यथेच्छ धुलाई करुन चांगलाच पाहुणचार करण्यात आला. या घटनेची कुणीतरी काढलेली चित्रफीत गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खापरखेडचा नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना नवरीकडील मुलांनी मनसोक्त धुलाई केल्यावर पाच लाख देत नाही, तोवर दाबून ठेवले. तेवढ्यात रात्री पैशाची व्यवस्था झाली आणि त्यांची सुटकाही झाली, मात्र व्हिडीओ व्हायरल झालाच.