पुणे I झुंज न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षा रविवारी देखील घेण्याचा मोठा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली आहे.
पुणे विद्यापीठाची परीक्षा ही १५ मार्चपासूनच सुरु होणार होती. मात्र एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यानुसार आता येत्या १५ एप्रिलपासून ही परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले गेलं आहे.
७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा
दुसरीकडे काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे. प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.
सराव परीक्षेची संधी
तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. यापूर्वी सोडवलेली उत्तरे सेव्ह करुन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरु होईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. अंदाजे, येत्या ७ एप्रिलपासून विदयार्थ्यांना सराव परीक्षा देण्यात येईल.
५० मार्कांसाठी १ तास अवधी
विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामध्ये ५० मार्कसाठी ६० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. तसंच निकालही ऑनलाईन पद्धतीनेच लावण्यात येणार आहे.
त्याच विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने…
ज्या विद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर, ऑनलाईन आणि सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण १० एप्रिलपर्यंत पात्र होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील.