“सुरक्षेसाठी नाही तर दिल्लीकडून मदत थांबवण्यासाठी भिंत !”
दिल्ली | झुंज न्यूज : कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे आता शेतकऱ्यांना दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहचता येत नाहीय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित असल्याचे चित्र दिसत आहे.
गरज पडली तर बोअरवेल खोदू
दिल्ली पोलिसांनी या भिंती उभारल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असला तरी आपण मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर आम्ही पाण्यासाठी बोरवेल खोदू. पाण्याचा पुरवठा बंद केल्याने आम्ही मागे हटू असा विचार सरकारने करु नये. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत गावी परत जाणार नाही,” असं पटीयाला येथून आंदोलनासाठी आलेल्या कुलजीत सिंग या शेतकऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे.
महिलांना सहन करावा लागत आहे त्रास
दिल्ली-चंढीगड सीमेवर शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंढीगडच्या बाजूनेही काही शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र शौचालयांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे. याच कारणामुळे अनेक शेतकरी आता उघड्यावर शौचाला जात आहेत. महिला आंदोलकांची संख्याही जास्त असल्याने उभारण्यात आलेली शौचायले त्यांना वापरलाय देण्यास प्राधान्य दिलं जात आहे. सरकार सध्या शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आंदोलकांनी केलाय.
सुरक्षेसाठी नाही दिल्लीकडून मदत थांबवण्यासाठी
संयुक्त किसान मोर्चामधील कायथल येथील स्वयंसेवक असणाऱ्या मनजीत ढिल्लोन याने सरकारने उभारलेल्या भिंती या सुरक्षेच्या कारणासाठी नसून दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांना केली जाणारी मदत रोखण्यासाठी असल्याचा आरोप केलाय. “आधी दिल्लीच्या बाजूने आमच्यासाठी अनेक पाण्याचे टँकर्स यायचे. आता भिंत उभरल्यानंतर केवळ हरयाणाच्या बाजूने येणाऱ्या टँकरवर आम्हाला अवलंबून राहवं लागत आहे. अनेकांना आता बाटली बंद पाणी विकत घ्यावं लागत आहे,” असं मनजीत याने सांगितलं. काही आंदोलन शेतकरी हे खालसा ग्रुपने उभारलेल्या आरओ वॉटर मशीनवर अवलंबून आहेत. २० लीटर पाण्याच्या बाटल्या भरण्यासाठी या मशीन्सचा वापर शेतकरी करत आहेत. या माहामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या इतर स्थानिकांकडूनही शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातोय.
समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न
जिंद, सोनपत आणि नारिला येथील आंदोलनाच्या ठिकाणी अनेक महिला आंदोलकही आल्या आहेत. रामरती देवी यांनी या ठिकाणी २९ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या छावण्यांवर दगडफेक करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाल्याच म्हटलं आहे. अनेक पंजाबी गायकांनी या आंदोलकांना पाठींबा दर्शवला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मंचावरुन अनेक सेलिब्रिटींनी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात असल्याचं म्हटलं आहे. मात्र अशावेळी हिंदू, शीख आणि मुस्लिमांनी एकत्र येण्याची गरज आहे. किसान मजदूर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आता पोलीस शेतकरी आंदोलकांना आंदोलनाच्या सध्याच्या ठिकाणांहून मागे ढकलण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांनाही बंदी
दिल्लीच्या सीमांवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे त्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्ली हरयाणा सीमेवर काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्यात. त्याचबरोबर तारा पसरवूनही नाकाबंदी करण्यात आली आहे. या भिंतीच्या मागे दिल्लीच्या बाजूने दूरदूरपर्यंत म्हणजेच अगदी सिंघोला गावातपर्यंत बॅरीकेट्स लावण्यात आलेत. या नाकाबंदीच्या दरम्यान पुढे प्रसारमाध्यमांना जाता येणार नाही असंही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून समर्थन
सुरक्षा भिंत, तारांचे कुंपण उभारण्याच्या निर्णयाचे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी समर्थन केले. २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी अडथळे तोडून दिल्लीत प्रवेश केला होता. सुरक्षेसाठी पोलिसांनी हेच अडथळे आता अधिक भक्कम केले आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले.