पुणे I झुंज न्यूज : जगप्रसिद्ध कोकण हापूस मध्ये कर्नाटक मधील निकृष्ट दर्जाच्या आंब्याची भेसळ बंद करावी अशी महत्वपूर्ण मागणी ‘ ग्लोबल कोकण ‘ अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांनी अॅग्रीकल्चरल अॅण्ड प्रोसेस्ड् फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (अपेडा )चे चेअरमन एम. अंगामुथु यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. जगप्रसिद्ध हापूस आंबा कोकणातील शेतकऱ्यांकडून थेट युरोप आणि अमेरिका येथे निर्यात करण्याचे नियोजन ‘ ग्लोबल कोकण ‘ अभियानाने केल्याची माहिती संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे दिली.
कर्नाटक मधील हापूस सारखा हुबेहुब दिसणारा पण हापूसची चव नसलेला, दर्जाहीन आंबा कोकण हापूस म्हणून देशात आणि विदेशात विकला जातो. त्यामुळे हापूस आंब्याचा दर्जा बिघडतो, किमती कमी होतात, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा पुरेसा मोबदला मिळत नाही. गेली दहा-बारा वर्ष अशा स्वरूपाची भेसळ राजरोस प्रमाणे चालू आहे. निकृष्ट दर्जाच्या आंब्यावर देवगड आणि रत्नागिरी हापूस म्हणून लेबल लावून हे आंबे सर्वसामान्य ग्राहकांना आणि परदेशात सुद्धा पाठवले जातात. यामुळे हापुस आंब्या विषयी गैरसमज निर्माण होतात, सौ नसलेला जाड सालीचा हापूस सारखा दिसणारा आंबा कोकणातील हापूस म्हणून ग्राहकांना खावा लागतो आणि ग्राहकांची फसवणूक होते. हा गैरप्रकार पूर्णतः बंद व्हावा. कोकणातल्या हापूसला यापुढील काळात हापुस म्हणता येईल अशी तरतूद जॉग्रफिक इंडिकेशन ( जीआय ) अंतर्गत या अगोदरच झालेले आहे. याची कडक अंमलबजावणी व्हावी व अशा स्वरूपाचा गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू आणि अपेडाचे चेअरमन एम अंगामुथु यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली.
ग्लोबल कोकणच्या युरोप आणि अमेरिकेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने यावर्षी संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत थेट कोकणातून देवगड रत्नागिरी आणि राजापूर मधून हापूस आंबे निर्यात होतील अशा स्वरूपाचे नियोजन करीत आहोत. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या बागे मध्ये निर्माण केलेला आंब्याचा एक्सपोर्ट ब्रांड जगभर पोहोचेल, असे संजय यादवराव यांनी सांगीतले.