पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आभाराच्या ‘फ्लेक्स’मुळे धुरळा उडाला आहे. शास्ती वगळून मूळ मिळकतकर भरण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. त्याचाबाबत आभाराचे फ्लेक्स राष्ट्रवादीने नव्हे, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांनी लावले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अपक्ष आघाडीचे नगरसेवक कैलास बारणे, भाजपा नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे फ्लेक उभारले आहेत. सोबतच अजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय मांढरे यांचाही फोटो आहे. सध्या या फ्लेक्सने शहरात धुरळा उडवला आहे.
“पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोठा दिलासा”… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मिळकत बिलातील शास्ती वगळून मूळ मिळकत कर भरावा, असा आदेश दिला. राज्य शासनाच्या लोकहिताच्या निर्णयाचे स्वागत आणि शहरातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार…असा मजकूर फ्लेक्सवर आहे. तसेच, “दादांचा शब्द अखेरचा शब्द” , बोले तैसा चाले त्याचि वंदावी पावले…अशी बिरुदावलीही लावण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देण्यासाठी शास्ती वगळून मूळ मिळकतकर भरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत आभाराचे फ्लेक्स लावायला हवे होते. मात्र, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून आभाराचे सोपस्कार पूर्ण केले. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी या निर्णयाबाबत सोशल मीडियावरसुद्धा आभार मानले नाही. तसेच, भोसरीत माजी आमदार विलास लांडे यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या आभाराचा एखादा फ्लेक्स लावला नाही. मात्र, राष्ट्रवादीशी संबंधित नसलेल्या बारणे यांनी जाहीरपणे आभार मानले आहेत, ही बाब राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.